
नैनाविरोधात उपोषणाची हाक
नवीन पनवेल, ता. २० (वार्ताहर)ः ‘नैना’विरोधात ‘गाव बंद’ आंदोलनाला सर्व स्तरांतून पाठिंबा वाढत आहे. या आंदोलनाच्या सातव्या दिवशी चिपळे, भोकरपाडा, कोप्रोली गावांमधील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनात शेकडो नागरिकांसह महिलांचाही सहभाग वाढत असून नैना प्रकल्प हद्दपार करण्याच्या निर्धारातून ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचा एल्गार पुकारला आहे.
‘नैना’विरोधात गाव बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पनवेल परिसरातील २३ हून अधिक गावे टप्प्याटप्प्याने सहभागी होत आहेत. आंदोलनाच्या सातव्या दिवशी चिपळे, भोकरपाडा, कोप्रोली गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी चिपळे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तीनही गावांतील ग्रामस्थांच्यावतीने नैनाविरोधी सभा घेण्यात आली. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या निर्धाराबरोबरच सर्व स्तरांतून सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. यावेळी शिवकरचे माजी सरपंच अनिल ढवळे यांनी आक्रमक शैलीमध्ये हा लढा आणखीन तीव्र करण्याचे संकेत दिले. तसेच शेखर शेळके यांनी नैना प्राधिकरण एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि महापालिका क्षेत्रातील तुलनात्मक माहिती लोकांसमोर मांडली. यावेळी अॅड. सुरेश ठाकूर यांनी देखील नैना विरोधी लढ्यामध्ये संपूर्ण पनवेल-उरण तालुका उतरावा, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी आंदोलनात्मक तसेच न्यायालयीन लढाईबाबत उपस्थित शेतकऱ्यांना राजेश केणी यांनी मार्गदर्शन केले. तसेच नैना प्रकल्प राबवल्याने जनजीवन कसे विस्कळित होणार आहे, याचे चित्र मांडण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणासाठी सज्ज असल्याचे सांगत आरपारचा लढा देण्याची तयारी दर्शवली आहे.
ः----------------------------------------------------------
क्रिकेटच्या माध्यमातून तरुणांचे प्रबोधन
पनवेल परिसरातील नैनाबाधित गावांतील तरुणांचा आंदोलनातील सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याच अनुषंगाने शनिवार-रविवार गावोगावी होत असलेल्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये समन्वयक पाठवून तरुणांचे प्रबोधन केले जाणार आहे. समालोचनाच्या माध्यमातून नैना प्रकल्पामुळे जमिनी कशा प्रकारे गिळंकृत होतील, याचे वास्तव मांडले जाणार आहे. तसेच ज्या मैदानावर आज क्रिकेट खेळत आहात ते मैदान भविष्यात शिल्लक राहणार नाही, याची जाणीव करून दिली जाणार आहे.
----------------------------------------------------------
प्रकल्पाला विरोध का आहे ?
- शेतकऱ्यांच्या एकूण जमिनीच्या ६० टक्के जमीन सिडको विकासकामासाठी फुकट घेणार आहे. उर्वरित ४० टक्के जमीन विकसित भूखंड / जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात देताना स्वतःच्या मालकीचा जमीन मोबदला कराच्या रूपाने द्यावा लागणार आहे.
- शेतीतील व्यवसाय, उत्पन्न, बोअरवेल, फळझाडे, शेतघर व विकास कामांच्या कालावधीत कोणतीही नुकसानभरपाई नाही.
- ही योजना दहा वर्षे कागदावरच कार्यरत आहे. प्रत्यक्ष विकास कामांकरिता अंदाजे ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागेल.
- सिडकोने दिलेल्या कराच्या मोबदल्यात ४० टक्के भूखंड विक्री करून उदरनिर्वाह करावा लागेल.
- या प्रकल्पात रोजगार निर्मिती नाही. प्रकल्पग्रस्त दाखला मिळणार नाही.
- हजारो झाडे कापली जाणार असल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम.
ः-----------------------------------------------------------
नैना प्रकल्प राबवल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळित होणार आहे. ‘गाव बंद’ आंदोलन करून जर सिडकोला जाग येत नसेल तर आम्ही बेमुदत उपोषणासाठी सज्ज आहोत.
- वामन शेळके, प्रकल्पग्रस्त शेतकरी
---------------------------------------
नैना विरोधी लढा तीव्र होत असताना २३ गावांसह पनवेल व उरणमधील स्थानिक व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सुद्धा या लढ्यात सहभागी होणे गरजेचे आहे. जेणेकरून नैनाला हद्दपार करणे शक्य होईल.
- अॅड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष, नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समिती