
धोकादायक पादचारी पुलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भांडुपमधील पादचारी पूल धोकादायक स्थितीत
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भांडुप, ता. २० (बातमीदार) ः भांडुप पश्चिमेतील टेंबीपाडा परिसरातील तानसा जलवाहिनीवरील पादचारी पूल मोडकळीस आला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
तानसा जलवाहिनीच्या वरील भागांना जोडण्यासाठी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. सध्या तो अत्यंत जीर्ण झाला आहे. पुलाचे लोखंड पूर्णपणे गंजले असून पायऱ्याही झिजल्या आहेत. झिजलेल्या पायऱ्यांमध्ये पाय अडकून पडण्याचा धोका आहे. पुलाच्या वरील पत्राही तुटलेल्या अवस्थेत आहे. पूल धोकादायक झाला असला तरी हजारोच्या संख्येने पादचारी धोका पत्करून तिथून ये-जा करत आहेत. कधीही कोसळून पडेल अशा अवस्थेत पूल आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मनसेतर्फेही बॅनर लावून पादचारी पूल न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोज शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला जीव मुठीत घेऊन पुलावरून ये-जा करीत असतात. भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत रहिवासी विनायक साळुंखे यांनी मांडले.
तानसा जलवाहिनीवरील पादचारी पूल कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पुलाचे काम करावे.
- मंगेश पाष्टे,
प्रभाग संघटक, मनसे, रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना एस विभाग