
भाकपचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
वाडा, ता. २० (बातमीदार) : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सात वर्षे पूर्ण होत आहेत, पण सरकारने त्यांच्या खऱ्या मारेकऱ्यांचा शोध घेतलेला नाही. हे निषेधार्ह असून पानसरेंच्या खुन्यांचा शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्या, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाड्याच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व सुनील पाटील, माधव चौधरी, कल्पेश पाटील, साक्षी पाटील यांनी केले. यावेळी सरकार व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमी भावाचा कायदा करा, भाताला बोनससह ३०५० रुपये हमीभाव द्या, शेतकरी शेतमजूर असंघटित कामगारांना ६० वर्षांनंतर मासिक ५००० रुपये, मासिक पेन्शन सुरू करा, नवीन वीजबिल कायदा रद्द करा आणि वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण थांबवा, शेतकऱ्यांची थकीत कर्जे संपूर्ण माफ करा, आदिवासी बिगर आदिवासींचे प्रलंबित वन हक्क दावे मंजूर करून ७/१२ नावे करा, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील यांना देण्यात आले. यावेळी प्रकाश खंडागळे, उन्नती काळे, नितीन पाटील, अनिल कोरडे, जगदीश मोकाशी, मनीषा पाटील, उमेश काळे, राजेश ठाकरे आदी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.