
विरारमध्ये समता कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी
नालासोपारा, ता. २० (बातमीदार) : बहुजन समता प्रबोधिनी या संस्थ्येच्या वतीने रविवारी समता कन्व्हेन्शन सेंटरचा पायाभरणी समारंभ पार पडला. मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू तथा माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते हा कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या समता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सेवा सुविधा उभारण्यात येणार आहेत.
विरारमधील बहुजन समता प्रबोधिनी ही संस्था मागील ३० वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. विद्यार्थांना शैक्षणिक अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणी ओळखून संस्थेच्या वतीने समता कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेंटर अद्ययावत अभ्यासिका, पारंपारिक व ई-ग्रंथालय, संगणक केंद्र, कलादालन, सेमिनार व परिषद सभागृह, स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र, गेस्ट हाऊस, मेडिटेशन सेंटर, कॅफेटेरिया, हेल्थ सेंटर, कम्युनिटी सर्विस लीगल एड सेंटर, विद्यार्थी कौशल्य विकास केंद्र, समुपदेशन केंद्र आणि सामाजिक संशोधन इत्यादी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तर खासदार राजेंद्र गावित यांनी या वास्तूचा उपयोग तळागळातील गरजू विद्यार्थ्यांना होणार असून या सेंटरची आवश्यकता जिल्ह्याला असल्याचे सांगितले. तसेच या सेंटरच्या उभारणीत ज्या सरकारी परवानग्या लागतील त्या तातडीने पालिकेच्या वतीने दिल्या जातील, तसेच पालिकेच्या वतीने ग्रंथालय निर्मितीसाठी सहकार्य केले जाईल, असे पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. या प्रसंगी भालचंद्र मुणगेकर यांच्यासह खासदार राजेंद्र गावित, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, आयुक्त अनिल कुमार पवार, अजीव पाटील, जीतुभाई शहा, प्रशांत राऊत, माजी नगरसेवक विलास चोरघे आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या ३० वर्षाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.