अखेर अपूर्ण सेवारस्त्याचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर अपूर्ण सेवारस्त्याचे काम सुरू
अखेर अपूर्ण सेवारस्त्याचे काम सुरू

अखेर अपूर्ण सेवारस्त्याचे काम सुरू

sakal_logo
By

कासा, ता. २० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरू आहे. त्यात चारोटी येथील पेट्रोल पंप जवळील सेवा रस्ता अपूर्ण असल्याने येथील अपघातात वाढ होत होती. त्यामुळे येथील अपघात कमी व्हावेत, यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार चारोटी येथील अपूर्ण सेवा रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आले.
चारोटी ते महालक्ष्मी दरम्यान असणारा सेवा रस्ता अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे चारोटी पेट्रोल पंपासमोरील क्रॉसिंगवर नेहमी अपघात होत आहेत. त्यामुळे येथील क्रॉसिंग चार दिवसांपूर्वी बंद करण्यात आले, पण बाजूचे सेवा रस्ता अपूर्ण असल्याने अपघाताची शक्यता कायम होती. त्यामुळे स्थानिकांसह अनेक वाहन चालकांनी प्रशासनाकडे हे अपूर्ण सेवा रस्ते पूर्ण करावेत, अशी मागणी केली होती. त्यातच चारच दिवसांपूर्वी पेट्रोल पंपाजवळील क्रॉसिंगवर तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले.
त्यानंतर कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी श्रीकांत शिंदे, आमदार विनोद निकोले, डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख त्याचबरोबर महामार्गाचे ठेकेदार राम राठोड यांनी एकत्र पाहणी करत तातडीने हे क्रॉसिंग बंद केले. त्याचबरोबर अपूर्ण असलेला सेवारस्त्याचे देखील दोन दिवसांत काम सुरू करण्याचे सांगितले होते. त्यानुसार एनएचआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सेवा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
....
पुढच्या महिन्यात महालक्ष्मीची प्रसिद्ध यात्रा भरणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून रखडलेला हा सेवा रस्ता पूर्ण करावा यासाठी आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट
...
पेट्रोल पंपासमोरील क्रॉसिंग बंद केले, पण दोन्ही बाजूचे सेवा रस्ते अजूनही अपूर्ण आहेत. खर पाहता येथे भुयारी मार्ग तयार केला पाहिजे. यासाठी अनेक वर्षांपासून एनएचआय प्रशासनाकडे मागणी केली आहे.
- कैलास चौरे, उपसरपंच, चारोटी