आजपासून बारावीच्या परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून बारावीच्या परीक्षा
आजपासून बारावीच्या परीक्षा

आजपासून बारावीच्या परीक्षा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : राज्‍यभरात मंगळवारी २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. मागील वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कॉलेजमध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार केंद्रेदेखील निश्चित करण्यात आली आहेत. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून एक लाख चार हजार ५६१ विद्यार्थी बसणार असून, १७३ केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षी प्रत्येक महाविद्यालयात परीक्षा केंद्रांची व्यवस्था करून त्या-त्या महाविद्यालयातच परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाच्या वर्षी परीक्षांसाठी १७३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे शनिवारपासून केंद्रांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी फिरत असल्याचे दिसून आले. त्यात यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून एक लाख चार हजार ५६१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात चार भरारी पथक नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात चार अधिकारी असणार असून, यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे.
...........................
परीक्षा केंद्रावर तयारीची लगबग
मंगळवारपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. सोमवारपासूनच परीक्षा केंद्र असणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयात त्यासंबंधी तयारीची लगबग पाहायला मिळाली. यावेळी कोरोना महामारीनंतर परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असल्यामुळे शाळेतील बाकांवर नंबर टाकणे, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करणे आदींची लगबग शाळांमध्ये सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
................................
विद्यार्थ्यांना आवाहन
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मिटल्‍यानंतर यंदा प्रथमच सर्व केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. त्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात द्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी विद्यार्थ्यांना केले.
--------------------------------
परीक्षा केंद्र
जिल्ह्यातील विविध भागांत १७३ परीक्षा केंद्र असणार आहेत. यामध्ये ठाण्यात ३३, नवी मुंबईत २७, कल्याण ५०, उल्हासनगर १५, अंबरनाथ ०५, मुरबाड ०५, शहापूर ०६, भिवंडी २१ आणि भाईंदर येथे ११ परीक्षा केंद्र असणार आहेत.