
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिवपदी ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती
मुंबई, ता. २० : आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. सध्या गृहरक्षक दलाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर ते कार्यरत होते. मुख्यमंत्री कार्यालयात आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ब्रिजेश सिंह यांची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. आता फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री झाल्यानंतर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची विशेष पोलिस आयुक्तपदावर, तर ब्रिजेश सिंह यांची प्रधान सचिव म्हणून पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भूषण गगराणी आणि प्रधान सचिव म्हणून विकास खारगे कार्यरत आहेत.