
संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा
ठाणे, ता. २० (वार्ताहर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या महिला आघाडीने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ठाणेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जे. एन. रनवरे यांनी दिली.
संविधानिक पदावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गरळ ओकल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात रविवारी (ता. १९) रात्री टेभींनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम कार्यालयाच्या बाहेर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत निषेध नोंदविला होता. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने संजय राऊत यांचे फोटो फाडण्यात आले, तसेच त्यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. या वेळी राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली.