
राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत शिवडीतील खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी
शिवडी, ता. २१ (बातमीदार) ः नवी दिल्लीमधील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या १५ व्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये मुंबईच्या यशस्वी ॲक्टिव्हिटी इन्स्टिट्यूटच्या शिवडीमधील खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी करत भरघोस पदकांची लयलूट केली आहे. या यशस्वी खेळाडूंचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शाखा क्रमांक २०६ च्या वतीने सोमवारी (ता. २०) सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिनिअर वयोगटात साहिल शिंदे व नीरज गौस्वामी यांनी सुवर्णपदक आणि सुधीर डिगे याने रौप्यपदक, ज्युनिअर वयोगटात मयुरी साळुंखे हिने सुवर्णपदक व सहायता यादव हिने रौप्यपदक तसेच सब-ज्युनिअर वयोगटात आर्वी जाधव हिने सुवर्णपदक व सावरी उतेकर व समर्थ धोंदे यांनी रौप्यपदक पटकावले. त्याबरोबर ज्युनिअर वयोगटात मयांक ढाकण, पृथ्वी सांडिस व सब-ज्युनिअर वयोगटात स्वरा म्हात्रे, सलोनी परवडी, मोरया नांदोसकर, दुर्वांक नांदोसकर, झिदान मलिक, सार्थक चव्हाण, वीर जोशी व म्रिदंग धारिया आदी खेळाडूंनी कास्यपदक पटकावले. सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक मास्टर अविनाश पवार यांच्याकडून प्रशिक्षण लाभले.