
फॅन्सी नंबरप्लेटवर आरटीओची नजर
अलिबाग, ता. २१ (बातमीदार) ः दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हायटेक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. वाहनांची नंबर प्लेट स्पष्ट दिसावी, सहज लक्षात यावी, याबाबत आरटीओकडून वारंवार सूचना केल्या जातात, मात्र तरीही काही हौशी केवळ आवडीपोटी फॅन्सी नंबरप्लेट लावतात. त्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. अशा फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई करण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.
जिल्ह्यामध्ये दुचाकी वाहनांचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. दर महिन्याला जवळपास २५ हजारांहून अधिक दुचाकी खरेदी केल्या जातात. त्यात नवीन तंत्रप्रणाली असलेल्या, वेगवेगळे आकार-रंगाची दुचाकी खरेदीला तरुणाईची विशेष पसंती असते. एकीकडे वाहन खरेदी वाढली आहे तर दुसरीकडे चोरीच्या घटनाही वाढत आहेत. चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार एक एप्रिल २०१९ पासून नोंदणी झालेल्या नवीन वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. दुचाकी वाहनांची विक्री झाल्यानंतर त्याची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाल्यावर हायटेक सेक्युरिटी नंबरप्लेट वाहनांवर बसविली जाते. परंतु काही मंडळी नोंदणी झाल्यावर हाय सेक्युरिटी नंबरप्लेट काढून फॅन्सी नंबर प्लेट बसवण्यावर भर देतात. यासाठी अतिरिक्त शुल्कही खर्च करतात. हायसिक्युरिटी नंबर प्लेटबाबत जनजागृती व्हावी यासाठी पेण उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही काही मंडळी फॅन्सीनंबर प्लेट बसण्याला प्राधान्य देत आहेत. अशा नंबर प्लेटवर पेण आरटीओने कारवाई सुरू केली आहे.
११ तालुक्यात कारवाई
पेण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, माणगाव, तळा, रोहा, मुरूड, सुधागड, म्हसळा या अकरा तालुक्यांचा समावेश येतो. त्यानुसार महामार्गासह वेगवेगळ्या रस्त्यावर नियमित गस्तीच्यावेळी फॅन्सी नंबर प्लेट बसवून वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
हायसिक्युरिटी नंबर प्लेट
हाय सेक्युरिटी नंबर प्लेटवर युनिक बारकोड व चीप आहे. त्यामुळे पोलिसांना एखादी विशिष्ट गाडी शोधायला किंवा एखाद्या गाडीविषयीची माहिती गोळा करायला फायदा होतो. चोरीला गेलेली गाडी शोधण्यातही या नंबर प्लेटमुळे मदत होते. इतकंच नाही तर गाडी चोरी केल्यानंतर चोराने जर ही प्लेट गाडीपासून वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर, गाडीच्या मालकाला त्या संदर्भातील मेसेजही जातो.
वाहनावरील हायसिक्युरिटी नंबरप्लेट चालक व मालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वाहन खरेदी केल्यावर नोंदणी झाल्यावर तातडीने दुचाकी मालकांना ही नंबर प्लेट दिली जाते. मात्र काही मंडळी फॅन्सी नंबरप्लेट लावतात. अशा वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
- महेश देवकाते, अधिकार, उपप्रादेशिक परिवहन, पेण