ठाण्‍यात ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरु होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्‍यात ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरु होणार
ठाण्‍यात ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरु होणार

ठाण्‍यात ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरु होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : प्रशासकीय सेवेतील दर्जेदार अधिकारी घडवणाऱ्या ठाण्याच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत एमपीएससी मार्गदर्शनपर वर्ग सुरू करण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यापूर्वी ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची मनविसे शिष्टमंडळाने भेट घेत ही मागणी केली होती. यूपीएससी अभ्यासक्रमासह एमपीएससीकरिता प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे येत्या काळात सीडी देशमुख संस्थेत एमपीएससी मार्गदर्शनाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व तत्सम स्पर्धा परीक्षा याकरिता लागणारी गुणवत्ता महाराष्ट्र राज्याच्या विविध ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यात सारथी, बार्टी व महाज्योती आदि शासकीय प्रशिक्षण केंद्र उपलब्ध असून, या संस्थेत विद्यार्थी क्षमता मर्यादित असल्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अपेक्षित यश संपादन करता येत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर परीक्षेचे स्वरूप नव्याने तयार केल्यामुळे स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यांच्यासाठी परीक्षेच्या नवीन स्वरूपानुसार मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणे आवश्यक असल्याचे मनविसेच्या निवेदनात म्हटले आहे. ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा देशभरात नावलौकिक आहे. या संस्थेतून प्रावीण्य मिळवत अनेक अधिकाऱ्यांनी देशभरातील विविध प्रशासकीय पदांवर काम केले आहे. आजमितीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या संस्थेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शनपर वर्ग सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयाकरिता ठाणे पालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
...............
खासदारांशी सकारात्मक चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन दिल्यानंतर याप्रश्नी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी चर्चा केली. खासदार शिंदे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ आयुक्तांना दूरध्वनीद्वारे लवकरात लवकर कार्यवाही करून विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून देण्याचे निर्देश दिले.