
साखरपुड्यानंतर आतिषबाजीमुळे आगीचा भडका
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : टिटवाळ्यानजीक सांगोडा गावात एका साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानिमित्त गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. या फटाक्यांच्या ठिणग्या जवळच असलेल्या सुक्या गवतावर पडल्या आणि गवताने पेट घेतला. झपाट्याने पसरलेल्या या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्याने गावकऱ्यांची एकच धावपळ झाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी येथे उभी केलेली काही वाहनेही आली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला आहे.
कल्याण ग्रामीण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांगोडा गावात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. वर-वधू पक्षाच्या यजमानांची लगबग गावात सुरू होती. साखरपुडा पार पडल्यानंतर आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आकाशात फुटणारे फटाके साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या फटाक्यांच्या ठिणग्या खाली पडत होत्या. या भागात सुके गवत असल्याने फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे सुके गवत पेटले. सुके गवत, रणरणते उन आणि वारा यामुळे ही आग झपाट्याने पसरली. या आगीत काही वृक्ष आणि येथे उभी केलेली एक-दोन वाहनेही सापडली. यामध्ये दुचाकी व कारचा समावेश आहे. गवताने पेट घेतल्यानंतर ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली.
-------------------------------------------
समाज माध्यमावर व्हिडीओ व्हायरल
आग लागल्याचे समजताच एकच गोंधळ उडाला. काही तरुण मंडळींनी सुरुवातीला झाडाच्या झावळ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने पाण्याचा मारा करत नंतर आग विझविण्यात आली. तोपर्यंत या आगीची झळ येथे पार्क केलेल्या काही वाहनांना बसली होती. या वाहनांचे जळून मोठे नुकसान झाले आहे. समाज माध्यमावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कल्याण ग्रामीण तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत याचा तपास सुरू केला आहे.