
शिवरायांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुलुंडच्या गव्हाण पाडा येथील ‘डेस्टिनी शिवप्रेमी मित्र मंडळ’ यांच्यातर्फे सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात डेस्टिनी हाईट्स, डेस्टिनी प्याराडाईज, डेस्टिनी प्राईड व डेस्टिनी वर्ल्ड या चार इमारतींमधील ५०० हून अधिक कुटुंबे सहभागी झाले होते. शिवकालीन शस्त्रास्त्र व शिवरायांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते. सकाळी दहा वाजता शिव प्रतिष्ठापनाकरून मंडळातील हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागात व ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गव्हानपाडा परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला पथकाचे लेझीम नृत्य व हल कल्लोळ मर्दानी आखाडा यांच्यातर्फे तलवारबाजी, दांडपट्टा, भालेफेक अशी विविध प्रात्यक्षिक सादर झाली. सायंकाळी ऋतिका मुरुडकर हिचे संगीत भजन, शिवव्याख्याते गौरव भांदिर्गे यांचे व्याख्यान आणि दीपोत्सव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक राजकीय व अराजकीय दिग्गजांनी हजेरी लावली व शिवरायांना मानवंदना दिली.