निवाराशेडअभावी प्रवासी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवाराशेडअभावी प्रवासी त्रस्त
निवाराशेडअभावी प्रवासी त्रस्त

निवाराशेडअभावी प्रवासी त्रस्त

sakal_logo
By

वाडा, ता. २३ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील कुडूस ही मोठी बाजारपेठ आहे. डी प्लस झोनमुळे येथे मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते; मात्र कुडूस येथे सर्व सोयींनीयुक्त बसथांब्यासाठी निवारा शेड नाही. त्यामुळे प्रवाशांना असुविधांचा सामना करत बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुविधांयुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
कुडूस ही ५२ गावांची महत्त्वाची बाजारपेठ असून डी प्लस झोनमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ वाढली आहे. बसथांब्यासाठी निवाराशेड सुविधा पुर्ण नसल्याने खरेदीदार, प्रवासी, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरदार यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. गेली अनेक वर्षे ही समस्या कायम असून एसटी महामंडळ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
कुडूस येथून वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू तसेच भिवंडी, कल्याण, शहापूर, वसई, ठाणे, मुंबई, पुणे या गावांना रोज जाणारे शेकडो प्रवासी असतात. यांच्याकडून लाखो रुपयांचे ऊत्पन्न एसटी महामंडळाला मिळत असूनही कुडूस येथे एसटी महामंडळांकडून सुविधांयुक्त प्रवासी निवाराशेड बांधण्यात आलेले नाही. दहा वर्षापूर्वी कोकाकोला कंपनीने दोन तात्पुरती निवाराशेड उभी केली आहेत. यामध्ये कोणतीही सुविधा नाहीत. अलीकडे या निवाराशेडला चारी बाजुंनी टपऱ्यांनी विळखा घातला असून ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही तक्रारीकडे डोळेझाक केली जात असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. त्यामुळे प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी व बैठक व्यवस्था अशा सुविधा असलेले मोठे एसटी बस निवाराशेड कुडूस येथे बांधावे, अशी येथील प्रवाशांची मागणी आहे.