पालिकेच्या ८० टक्के गोवर लसीकरणाने स्थिती नियंत्रणात

पालिकेच्या ८० टक्के गोवर लसीकरणाने स्थिती नियंत्रणात

नव्या वर्षात गोवर आटोक्यात
पालिकेच्या ८० टक्के गोवर लसीकरणाने स्थिती नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेने गोवर बाधित प्रभागातील ८० टक्क्यांहून अधिक मुलांचे तीन महिन्यांत यशस्वीपणे लसीकरण केले आहे. त्याचे परिणाम दिसून आले असून नव्या वर्षात शहरात गोवरचा एकच रुग्ण आढळून आला आहे. पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवरचा प्रादुर्भाव संपूर्ण शहरात नियंत्रणात आहे. गोवरने बाधित प्रभागातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांच्‍या लसीकरणाचे उद्दिष्टही पूर्ण झाले आहे.

आकडेवारीनुसार १ डिसेंबरपासून पालिकेने हाती घेतलेल्या उद्रेक (आऊटब्रेक) प्रतिसाद लसीकरण मोहिमेत २.३२ लाख मुलांपैकी १.९८ लाख मुलांना (८५.२९ टक्‍के) ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील एमआर लसीचा अतिरिक्त डोस देण्यात आला. यंदा शहरात गोवरचा एकच प्रादुर्भाव दिसून आला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उद्रेक प्रतिसाद लसीकरण मोहीम सुरू केली. एमआर लस घेतलेली नाही किंवा ती मुलांना देण्याबाबत पालकांनी संकोच बाळगलेल्या ठिकाणी मोहीम फार महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याने समुदाय आरोग्य स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नगरसेवक आणि धर्मगुरू यांच्या मदतीने मुलांची काळजी घेण्यास सुरुवात केली आणि वॉर्डांमध्ये लसीबद्दल जागरूकता निर्माण केली. ऑक्टोबर २०२२ मध्ये एम-पूर्व प्रभाग (गोवंडी) मध्ये उद्रेक झाल्यापासून, शहरात २० मृत्यू झाले आहेत त्यांपैकी १२ संशयास्पद गोवर मृत्यू आहेत.

भविष्यातील उद्रेक टाळण्यासाठी नियमित लसीकरण
गोवर लसीकरणाचे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र, भविष्यातील उद्रेक टाळण्यासाठी नियमित लसीकरणावर भर देण्याची गरज आहे. आम्ही उद्रेक झालेल्या आरोग्य केंद्रांमध्ये ८०-८५ टक्‍के अतिरिक्त गोवर डोस दिले आहेत. गोवर लसीकरणाची आमची मोहीम सुरूच आहे. एकूण लसीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असे पालिका आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

यंदा एकच रुग्ण
नव्या वर्षात जानेवारीत गोवरचा फक्त एकच रुग्ण नोंदवण्यात आला आहे. कुलाब्याच्या आरोग्य केंद्रात त्याची नोंद झाली आहे. दोन पॉझिटिव्ह केसेस आढळल्या होत्या. इतर सर्व सक्रिय गोवर उद्रेक डिसेंबरमध्ये नोंदवले गेले होते, असे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त गोवर लसीकरण करणे गरजेचे आहे. आम्ही नियमितपणे लसीकरण आणि देखरेखीचा आढावा घेत आहोत. सध्या समाधानकारक स्थिती आहे.
- डॉ. सुभाष साळुंखे, टास्क फोर्स प्रमुख, माजी आरोग्य संचालक

मुंबईतील सद्यःस्थिती
एकूण बाधित ः ७९
सर्वाधिक प्रमाण
- एल वॉर्ड (कुर्ला) ः १२
- ई वॉर्ड (भायखळा) ः ७
- पीएन वॉर्ड (मालाड पश्चिम) ः ७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com