
मुंबईच्या रस्त्यावर एसी ‘डबल डेकर’चा डौल
मुंबई, ता. २१ : बेस्टच्या ताफ्यातील पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस आज मोठ्या दिमाखात धावली. बहुचर्चित अशा डबल डेकर बसमधून पहिला प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. बससोबत सेल्फी काढण्यासाठीही अनेकांची झुंबड उडाली होती. अवघे सहा रुपये तिकीट असलेल्या नव्या डबल डेकर बसचे मुंबईकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषतः वरच्या डेकवरून प्रवास करण्याला अनेकांनी पसंती दिली.
नवी डबल डेकर बेस्ट बस क्रमांक ११५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीएदरम्यान धावणार आहे. आज सकाळी ८.४५ वाजता पहिली बस धावली. वातानुकूलित आणि विजेवरील डबल डेकर बस पाहण्यासाठी गर्दी झाली होती. धावणाऱ्या बसकडे अनेक जण अतिशय कुतूहलाने पाहत होते. त्यातून प्रवास करण्याचा आनंदही अनेकांनी घेतला. आजच्या पहिल्या दिवशी कार्ड आणि ‘चलो ॲप’ पेमेंटबरोबरच रोख पैसे घेऊनही प्रवासाची सुविधा बसमध्ये देण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांनी पहिल्या फेरीपासूनच वरच्या डेकला पसंती देत प्रवासाचा आनंद घेतला. खालील आसनव्यवस्थेपेक्षा वरील डेकवरून प्रवास करण्याला प्रवाशांनी पसंती दिली.
एक वेगळीच मजा!
आधीच्या डबल डेकरच्या तुलनेत नव्या बसमध्ये खुली जागा अधिक आहे. मुंबईतील डबल डेकर बसने प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी रुतुजा पाटील यांनी दिली. मुंबईतील उकाड्यात एसी बसमधून गारेगार प्रवास करण्याचा अनुभव अतिशय आनंदी होता, अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी राजश्री पाटील हिने दिली. इतर वातानुकूलित बसच्या तुलनेत प्रवाशाच्या डोक्यावर एसी ब्लोअरची व्यवस्था नाही. मध्यवर्ती एसी असल्याने बसमध्ये काचेच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाची घुसमट होत आहे, असेही तिने सांगितले.
मार्चअखेर आणखी चार बस
नव्या डबल डेकर बसमध्ये उभे प्रवासी धरून एकूण ७८ जणांची क्षमता आहे. मात्र, वरील डेकवर उभ्याने प्रवासाची संधी मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीएदरम्यान सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत बस धावणार आहे. मार्चअखेर आणखी तीन ते चार डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे.