आदिवासी लोकसाहित्य एक अमूल्य ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी लोकसाहित्य एक अमूल्य ठेवा
आदिवासी लोकसाहित्य एक अमूल्य ठेवा

आदिवासी लोकसाहित्य एक अमूल्य ठेवा

sakal_logo
By

विरार, ता. २१ (बातमीदार) : महाराष्ट्रातील आदिवासी लोकसाहित्य हे एक अमूल्य ठेवा आहे. आदिवासी लोकगीतांमधील आशयसंपन्नता व साहित्यिक मूल्यभान जपणारी आदिवासींची दृष्टी उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन डॉ. सखाराम डाखोरे यांनी केले. साहित्य अकादमी, मुंबई आणि कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय, तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील आदिवासी लोकसाहित्य या विषयावर दोनदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
उद्‍घाटनाच्या सत्रात साहित्य अकादमी मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर यांनी स्वागतपर भाषण केले. तलासरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांनी प्रास्ताविक केले. या वेळी साहित्यिक डॉ. विनोद कुमरे हे उद्‍घाटक, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे हे बीजभाषक; तर साहित्यिक रंगनाथ पठारे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ‘महाराष्ट्रातील आदिवासींचे लोकसाहित्य’ या विषयावरील सत्रात प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजू शनवार यांनी लोकसाहित्याची संकल्पना व स्वरूप या विषयावर आपले मत मांडले.
‘लोकसाहित्यातील नवे संदर्भ आणि आव्हाने’ या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ. अंजली मस्करनेस यांच्या अध्यक्षतेखाली हिरामण झिरवळ यांनी ‘कोकण आदिवासींच्या लोकसाहित्यातील गीतांचे संदर्भ’ या विषयावर; तर चिंतामण धिंदळे यांनी ‘आदिवासी लोकसाहित्यातील विविध धारा’ या विषयावर आपले विचार मांडले. कथावाचन या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक प्रभू राजगडकर उपस्थित होते. या वेळी कथाकार सुनील गायकवाड यांनी भिलोरी बोलीतील दोन कथांचे सादरीकरण केले. अध्यक्षीय समारोपात प्रभू राजगडकर यांनी ‘आदिवासींच्या अस्मिता आणि त्यावरील आक्रमण’ या विषयाचा आढावा घेतला. कवयित्री व प्रकाशक सुमती लांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवितावाचन सत्रात रेखा जुगनाके यांनी गोंडी, संतोष पावरा यांनी पावरी, तुकाराम धांडे यांनी डांगी; तर रवी बुधर यांनी वारली बोलीतील कवितांचे सादरीकरण केले.