
वसई किल्ल्याची प्रवेशद्वार मोजतोय अंतिम घटका
विरार, ता. २१ (बातमीदार) : नैसर्गिक व मानवी प्रभावामुळे जंजिरे वसई किल्ल्याची प्रवेशद्वारे अंतिम घटका मोजत आहे. गेली अनेक वर्षे लाकडी प्रवेशद्वाराच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभाग सायन अंतर्गत एकही उपाययोजना न केल्याने सदर प्रवेशद्वारे चक्क मोडून व कुजून गेलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या सागवानी फळ्या, त्यावरील पोलाद पट्ट्या, साखळ्या, लाकडी फळ्या सारेच पार खराब होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पुरातत्त्व विभागाने अनेकदा या प्रवेशद्वाराची दुरुस्ती करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली. पण अजूनही त्यावर कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. अशात किल्ल्याच्या जवळच असणारी खारी हवा व पाण्याचा प्रवाह यामुळे प्रवेशद्वार अंतिम घटका मोजत आहे. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत स्वखर्चाने मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेले माहिती फलक मोडले आहे. यामुळे केंद्रीय पुरातत्त्व विभागाने किल्ल्याच्या प्रवेशद्वारात पूर्ण वेळ कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची गरज आहे, असे दुर्गमित्रांनी अनेकदा सुचवले आहे.
----------------------------
जंजिरे वसई किल्ल्याची दुरवस्थेत असणारी दोन्ही प्रवेशद्वारे जतन करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, नामशेष होणारी प्रवेशद्वारे संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू इच्छितो. पुरातत्वीय दृष्टीने ही प्रवेशद्वारे संवर्धन झाल्यास ऐतिहासिक पाऊलखुणा जपल्या जातील."
- श्रीदत्त राऊत,किल्ले वसई मोहीम प्रमुख आणि इतिहास अभ्यासक
....
वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाबतची माहिती सायन कार्यालयाला कळविली आहे. तेथून आदेश आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
- कैलास शिंदे, अधिकारी, पुरातत्त्व विभाग, वसई किल्ला