
दारूची लाच घेताना वनपालाला अटक
वाडा, ता. २१ (बातमीदार) ः तालुक्यातील नेहरोली आणि बाणगंगा परिमंडळाच्या दोन वनपालांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विजय धुरी आणि विष्णू सांगवे अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी (ता. २१) दुपारी करण्यात आली.
वनविभाग वाडा येथील बिनशेती औद्योगिककरिता ना हरकत दाखला मिळण्याप्रकरणी पंचनामा करण्यासाठी एक प्रकरण वनपाल विजय धुरी यांच्याकडे आले होते. हे काम करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपये आणि दारूची लाच मागितली. याला वनपाल विष्णू सांगळे यांनी प्रोत्साहन दिले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाडा येथील वनविभागाच्या शासकीय कार्यालयात सापळा रचला. त्या वेळी धुरी हे दारूची बाटली घेताना रंगेहाथ सापडले. ही कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलिस हवालदार अमित चव्हाण, विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दीपक सुमडा, पोलिस नाईक स्वाती तारवी यांच्या पथकाने केली.