
आंबिवलीतील इराणी टोळीतील दोघांना अटक दोघांना मुंबई पोलिसांकडून बेड्या
मुंबई, ता. २१ : आंबिवलीच्या इराणी टोळीतील दोन साथदारांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी नेरळमधून अटक केली. अमजद शहापूर इराणी ऊर्फ चित्तू आणि टाकी इराणी अशी त्यांची नावे असून त्यांच्याहून २५ हून अधिक पोलिस ठाण्यात लूटमार, चोरी, फसवणूक अशा विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
शरयू शरद वाडेकर या १५ फेब्रुवारी रोजी लोअर परळ येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. एटीएममधून आलेल्या काही नोटा फाटलेल्या असल्याचे वाडेकर यांना समजले. त्या एटीएमबाहेर येताच फाटक्या नोटा बदलून द्यायचे, दोघांनी आश्वासन दिले. नोटा बदलून देण्यासाठी मोजून देण्याच्या उद्देशाने पैसे घेऊन हातचलाखी करीत आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी त्यांनी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणचे सीसी टीव्ही चित्रीकरण तपासले. अमजद इराणी आणि टाकी इराणी संशयित असल्याबाबत माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. हे आरोपी कल्याणमधील आंबिवली परिसरातील असल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते नेरळ परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी इराणी पाड्यात छापा टाकत दोघांना अटक केली.