
महाराष्ट्र रेल्वे बोर्डाची फसवणूक प्रकरणी एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पाच कोटींच्या फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने छत्तीसगडमधून एका आरोपीला अटक केली. जगजोत अमरिक सिंह असे त्याचे नाव असून तो झारखंडमधील गोलमुरी येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाची रक्कम बनावट धनादेशाद्वारे हस्तांतरित केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
तत्कालीन सहायक कामगार आयुक्त अशोक डोके यांच्याकडे महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. या बोर्डाच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे पाच कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार डोके यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. गेल्या महिन्यात बोर्डाचा लेखापाल व त्याचा सहकारी बँकेच्या मशीद बंदर येथील शाखेत गेले. त्या वेळी पासबुक नोंदीनुसार खात्यात पाच कोटी सहा लाख रुपये कमी असल्याचे समोर आले. ही रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेले धनादेश कोणालाच दिले नसल्याचे तपासणीत निदर्शनात आले. आठ बनावट धनादेशाद्वारे ही रक्कम मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली होती. याप्रकरणी बँकेतील २५ लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. गुन्ह्यांत वापरण्यात आलेले बनावट ओळखपत्र आरोपीने तयार केल्याचा संशय आहे. त्यासाठी नवी मुंबईतील बनावट पत्ता देण्यात आला होता. आरोपीने हे ओळखपत्र कोठून तयार केले, याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.