
मोक्कातील फरार आरोपी जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः कल्याण पूर्वेत दहशत माजवणाऱ्या ए.के. गॅंगच्या मुसक्या कोळसेवाडी पोलिसांनी आधीच आवळल्या आहेत. याच गॅंगचा एक सदस्य असलेला शुभम गोसावी (वय ३५) हा गेल्या वर्षभर पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर भिवंडी येथून पोलिसांनी गोसावी याला बेड्या ठोकल्या असून ए.के. गँगची दहशत कमी करण्यात यश मिळवले आहे.
शुभम गोसावी हा कल्याणमधील ए के गँगचा सदस्य आहे. या गँगची कल्याण शहरात विशेष करून कल्याण पूर्व परिसरात दहशत होती. या गँग विरोधात पोलिसांनी मोक्कांतर्गत कडक कारवाई केली. या टोळीचा मोरख्या अभिजीत कुडाळकर याच्यासह नऊ सदस्यांना कोळसेवाडी पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, गँगचा सदस्य शुभम गोसावी हा पसार झाला होता. वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो कधी कल्याण, तर कधी कोल्हापूर, पुणे अशी आपली ठिकाणे वारंवार बदलत होता. अखेर कोळसेवाडी पोलिसांना शुभम गोसावी हा भिवंडीत लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास भिवंडीतून सापळा लावून शुभम गोसावी याला अटक केली.