
पालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
वाशी, ता. २१ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून २१ फेब्रुवारी रोजी सहायक आयुक्त व प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केल्या आहेत. आगामी आठवडाभरात पालिकेच्या सर्व विभागात कार्यालयात कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पदस्थापना करण्यात येणार असल्याचे प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असणाऱ्या सात सहायक आयुक्त व प्रशासकीय अधिकारी यांच्या पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अंतर्गत बदल्या केल्या आहेत. आयुक्तांनी काढलेल्या आदेशपत्रात प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आदेशान्वये अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे म्हटले आहे. यात सहायक आयुक्त संजय तायडेंची समाज विकास विभागातून घणसोली विभाग कार्यालयात, मालमत्ता विभागातील शशिकांत तांडेल यांची ए-बेलापूर विभाग, घणसोली विभागाचे सहायक आयुक्त शंकर खाडे यांची एच-दिघा विभाग, भांडार विभागाचे चंद्रकांत तायडेंची परवाना विभाग, ए-बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांची भांडार विभाग व मालमत्ता विभागात, एच-दिघा विभागाचे सहायक आयुक्त मनोहर गांगुर्डेंची बी-नेरूळ विभागाच्या सहायक आयुक्तपदी, नेरूळ विभागाचे सहायक आयुक्त सुनील पाटील यांची ई-कोपरखैरणे विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, जर बदलीच्या ठिकाणी कर्मचारी रुजू होऊन त्याचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला नाही, तर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.