
आता ५० टक्के सवलतीत आरोग्य तपासणी
विरार, ता. २५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने सर्वसामान्य रुग्णांना कमी खर्चात विविध चाचण्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निदान, लाईफ स्कॅन आणि युनिक डायग्नोस्टिक या तीन खासगी लॅबसोबत करार करण्यात आला आहे. वसईत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महापालिकेने या तीन लॅबसोबत करार प्रक्रिया नुकतीच पार पाडली आहे. यामुळे ५० टक्के सवलतीत रुग्णांना तपासणी करून मिळणार आहे. याबाबत वसईचे माजी आमदार डोमणिक घोन्सालवीस यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता.
जवळपास दोन हजार कोटींचे आर्थिक बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या चार रुग्णालयांत व २१ आरोग्य केंद्रांत आवश्यक चिकित्सा आणि चाचणी केंद्र नव्हते. पालिकेचे डॉक्टर या चिकित्सा व चाचण्या खासगी लॅबमधून करून घेण्यासाठी रुग्णांना भाग पाडत होते. या चाचण्या रुग्णांच्या आर्थिक क्षमतेपलीकडे असल्याने अशाप्रकारची चिकित्सा-चाचणी केंद्र पालिका रुग्णालयातच सुरू करावी, अशी मागणी वसईच्या ठाकरे गटाने १० ऑक्टोबर २०२२ च्या पत्रान्वये केली होती.
-----------------------------
आर्थिक लूट थांबणार
शारीरिक अनेक सूक्ष्म तपासण्यांकरिता नागरिकांना खासगी रुग्णालये किंवा लॅबवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा चाचण्यांच्या निमित्ताने ही रुग्णालये व लॅब गरजू रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. हा आर्थिक भुर्दंड रुग्णांच्या क्षमतेपलीकडे असतो. रक्ततपासणीसारख्या छोट्या चाचण्याही खासगी लॅबमधून करून घ्याव्या लागत आहेत. ही अडचण लक्षात घेता वसई-विरार महापालिकेच्या विशेषकरून नालासोपारा येथील रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, डायग्नोस्टिक सेंटर व बायोकेमिस्ट्री अनुषंगिक चाचणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
-----------------------
वसई-विरार महापालिकेने आवश्यक चिकित्सा व चाचणी केंद्रांबाबत तातडीने पावले उचलली आहेत. त्यासाठी निदान, लाईफ स्कॅन आणि युनिक डायग्नोस्टिक या तीन खासगी लॅबसोबतची करार प्रक्रिया नुकतीच पार पाडण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून गरजू रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दरात एमआरआय, सीटी स्कॅन व अन्य महत्त्वाच्या चाचण्या करून घेता येणार आहेत.
- डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पालिका