
विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा गौरव
वाडा, ता. २३ (बातमीदार) ग्रामीण भागातील लेखकांच्या व साहित्यिकांच्या साहित्याला हक्काचे विचारपीठ मिळण्याच्या उद्देशाने वाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये १६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ज्ञानदा प्रकाशन या संस्थेने व त्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या ज्ञानार्जन या साप्ताहिकाने शिवजयंतीच्या दिवशी ज्ञानदा प्रकाशन व ज्ञानार्जन साप्ताहिकाचा १६ वा वर्धापनदिन तसेच छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन वाडा येथे पां. जा. हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी ज्ञानार्जन साप्ताहिकाच्या अंकाचे तसेच ज्ञानदा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या कसारा, ता. शहापूर येथील दामू धादवड यांनी लिहिलेल्या अनुभव निसर्गातील व निसर्गातील नवलकथा या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच छत्रपती प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात प्रशासकीय कामामध्ये वाडा पोलिस ठाण्याला पालघर जिल्ह्यात प्रथम व कोकण विभागात पाचवा क्रमांक मिळाल्याबद्दल वाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दशरथ पाटील, ग्रामीण भागात उत्कृष्ट पत्रकारिता करणारे पालघर येथील सचिन जगताप यांना स्व. राम बा. पाटील स्मृती आदर्श पत्रकारिता पुरस्कार, कृतिशील पत्रकार म्हणून शशिकांत कासार (वाडा) यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच आदर्श शेतकरी म्हणून अजय राऊत, महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार नवनाथ अनंता शिंदे, रमेश यल्लप्पा पवार, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार हर्षला हरेश पाटील, सामाजिक क्षेत्रात कमळाकर पाटील, पौर्णिमा पवार तर शिल्पकला क्षेत्रात आशिष साळवी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती संपादक व संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे यांनी दिली.