
घरफोडी करणाऱ्याला अटक
मानखुर्द, ता. २३ (बातमीदार) ः घरफोडी करून पळालेल्या अशरफ बेग ऊर्फ मेंढा याला कुर्ला पोलिसांनी रविवारी (ता. १९) अटक केली. त्याने कुर्ल्याच्या तकियावाड परिसरात घरफोडी करून दागिन्यांची चोरी केली होती. त्याला धारावीच्या एकेजी नगर येथील मैदानाजवळून ताब्यात घेऊन चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले. काही दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या तकियावाड येथील मासुमबाई चाळीतील रहिवासी आझाद शेख यांच्या घरात चोरी झाली होती. ते घरात नसताना चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दागिने चोरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी आझाद यांनी कुर्ला पोलिस ठाणे गाठत अज्ञात चोराविरोधात तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र होवाळे यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत सहायक निरीक्षक नंदूलाल पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकावर या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी सोपवली. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना, अशरफ या सराईत गुन्हेगाराने ती घरफोडी केल्याची पथकाला मिळाली. तो धारावीच्या एकेजी नगर परिसरात असल्याची माहिती खबऱ्यांनी पथकाला दिली. त्या माहितीच्या आधारे पथकाने त्याला सापळा लावून त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले.