नेरळ शिवसेना शाखेच्या वादावर पडदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळ शिवसेना शाखेच्या वादावर पडदा
नेरळ शिवसेना शाखेच्या वादावर पडदा

नेरळ शिवसेना शाखेच्या वादावर पडदा

sakal_logo
By

नेरळ, ता. २२ (बातमीदार) : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाचा निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यावर नेरळ शिवसेना शाखेवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. शाखेचे कुलूप फोडून शाखेत घुसल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. या प्रकारानंतर शाखा पुन्हा ठाकरे गटाला मिळाल्याने या वादावर पडदा पडला आहे. मात्र, या प्रकरणाने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेरळ पोलिसांनी हे प्रकरण योग्यरित्या हाताळल्याने याला कोणतेही गालबोट लागले नाही.
शिवसेना आणि शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाचे असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून १७ फेब्रुवारीला आल्याने राज्यात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला होता. परंतु, गाव पातळीवरील शाखेवर कोणाचा हक्क असणार, यावर कोणताच निर्णय झाला नाही. काही ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी अतिउत्साहाच्या भरात शाखेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. नेरळ येथील शिवसेना शाखा ही जुनी आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी १७ फेब्रुवारीला रात्री कुलूप फोडून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. यावरून ठाकरे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. नेरळ शिवसेना शाखा ही रवींद्र जाधव आणि संजय मनवे यांच्या नावावर आहे. कडवट शिवसैनिक म्हणून संजय मनवे हे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. ही खासगी मालमत्ता असल्याने संजय मनवे यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत शाखा खुली करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या वादावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे चित्र आहे.

नेरळ पोलिसांची सावध भूमिका
नेरळ शिवसेना शाखेची जागा ही खासगी मालमत्ता असल्याने तिच्यावर मालकी हक्क आहे. कायद्यात मालकी हक्क हा त्याच मालकीचा असतो ज्याच्या नावाने ही वास्तू उभी आहे. शिंदे गटाच्या शिवसैनिकांना याबाबत माहीत असतानाही त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले. यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नेरळ पोलिस ठाण्याला घेराव घातला. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे नेरळ शहरप्रमुख हेमंत क्षीरसागर व पदाधिकारी शिवसैनिकांनी लावून धरली. नेरळ पोलिसांनी सावध भूमिका घेत शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून रहावी, यासाठी शाखा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या वेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांसह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.