माणकोली उड्डाणपूल मे पर्यंत वाहतूक सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणकोली उड्डाणपूल मे पर्यंत वाहतूक सेवेत
माणकोली उड्डाणपूल मे पर्यंत वाहतूक सेवेत

माणकोली उड्डाणपूल मे पर्यंत वाहतूक सेवेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : मोटागाव-माणकोली खाडी पूल आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले असून मे महिन्‍यापर्यंत हा पूल आणि जोडरस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. माणकोली पुलामुळे ठाणे-डोंबिवली प्रवासातील प्रवाशांची ४० मिनीटे वाचून त्यांना अवघ्या २० मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. या पुलामुळे कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडी कमी होऊन एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून रस्त्यांचे हे जाळे दळणवळणाच्या दृष्‍टिने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

कल्याण-डोंबिवली व उपनगरांतील नागरिकांना ठाणे व मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी पूर्वी लोकलशिवाय पर्याय नव्हता. परंतु, २००६ च्या पुरामध्ये लोकलसेवा कोलमडली आणि ठाणेच्‍या पलीकडचे जनजीवन ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण-डोंबिवलीकरांना ठाणे गाठायचे म्हटले की, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बायपास, महापे शिळ मार्ग हे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, मुंबई-नाशिक महामार्गाचा प्रवास हा वेळेचा अपव्यय करणारा असून, मुंब्रा बायपास, महापे शिळमार्गे या रस्त्यांचा वापर अधिक केला जातो.

गेल्या काही वर्षात कल्याण-शिळ मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हा प्रवासही कोंडीचा होऊ लागला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर देखील देसाई खाडी पूल, पलावा पूल यांसारख्या पुलांचे जाळे उभारून येथील कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे सर्व पर्यायी मार्ग सध्याच्या घडीला वेळखाऊ असल्याने उल्हास खाडीवर सहा पदरी माणकोली पूल आणि जोडरस्ता बांधण्याचा निर्णय घेतला गेला.
---------------------------------------------------
पुलाचे काम जलदगतीने...
माणकोली उड्डाणपुलाची प्रक्रिया २०१३ पासून सुरू झाली. माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रथम या पुलाच्या कामासाठी एमएमआरडीएकडून सुमारे २०० कोटीचा निधी मंजूर करुन आणण्यात महत्त्‍वाची भूमिका बजावली.

२०१४ मध्ये या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रत्यक्षात या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सप्टेंबर २०१६ ला करण्यात आले. तीन वर्षात हा पूल पूर्ण करण्याचा मानस होता. परंतु, तांत्रिक अडचणी आणि कोरोना कालखंडामुळे या कामास विलंब झाला.

कोरोना कालखंडानंतर मात्र आता कामाने वेग पडल्याचे पहायला मिळत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या पुलाच्या कामांत जातीने लक्ष घालत आहेत. पुलासोबतच जोड रस्त्याचे काम एमएमआरडीए पूर्ण करत आहे.

महानगर आयुक्तांनी मंगळवारी या कामाची पाहणी केली आहे. पुलाचे आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा यावेळी एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी केला असून, मे अखेरपर्यंत पूल वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन केले आहे.
---------------------------------------------------
पुलामुळे होणारे फायदे...
-डोंबिवली परिसरातील नागरिक माणकोली पुलावरून २० मिनिटांत ठाणे, ५० मिनिटांत मुंबईत पोहचणार आहे.
-डोंबिवलीतील नोकरदारांची शिळफाटा, कोन, दुर्गाडी येथील कोंडीतून कायमची मुक्तता होणार
-डोंबिवलीतून माणकोली पुलावरून थेट मुंबई-नाशिक महामार्गावर जाता येईल.
-शहापूर, नाशिक दिशेने जाण्यासाठी यापुढे कल्याण, पडघा, कोन येथून जाण्याची आवश्यकता नाही.
-माणकोली पुलावरून ठाणे, मुंबईकडून येणारी वाहने मोठागाव येथील वळण रस्त्याने टिटवाळा, शिळफाटा कडे जाऊ शकतील.
--------------------------
पुलाची लांबी १२७५ मीटर
जोडरस्ता १.३ किलोमीटर