
गणेशपुरीकरांना मिळणार मुबलक पाणी
वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील स्वामी नित्यानंद महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणेशपुरी येथे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे उपवन येथे भव्य तीन लाख लिटर पाणी साठवणूक टाकी व पंप हाऊसचे सरपंच संदीप खिराडे व उपसरपंच प्रमोद जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
गणेशपुरी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्वामी नित्यानंद महाराजांचे तीर्थक्षेत्र व येथील भाविक, भक्त, ग्रामस्थ यांना या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या भेडसावत होती. जुनी पाण्याची टाकीही लहान व नादुरुस्त, तसेच ठिकठिकाणी झिरपत असल्याने या गावांना व पाड्यांना मुबलक पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे येथे पाणीटंचाई जाणवत होती. नुकताच ग्रुप ग्रामपंचायती सरपंच संदीप खिराडे तसेच उपसरपंच प्रमोद जाधव यांनी ठाणे येथे संबंधित विभागाकडे गेल्या तीन महिन्यांपासून सततचा पाठ पुरावा करून अथक परिश्रम घेऊन वनविभाग ठाणे यांच्याकडून जागेची रीतसर परवानगी घेतली. येथील उपवन परिसरात नागरी सुविधाअंतर्गत तीन लाख लिटर पाणी साठवण टाकी व पंप हाऊसचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
या वेळी गणेशपुरी ग्रामपंचायतीचे सदस्य किरण हाडळ, अंजली काळात, श्रेया पाटील, रमेश कामडी, दीपाली कोल्हेकर, कृपाली पाटील, राहुल चव्हाण, श्यामसुंदर जत्तन, प्रिया सुतार, प्रकाश सुतार, पारू घाटाळ, ऊर्मिला भोरड, गीतांजली घरत आदी सदस्यांसह हरिश्चंद्र पाटील, प्रभाकर व दीपक गोहिल तसेच गणेशपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते रामू नाईक, डॉ. योगेश पाटील, माधव जाधव, बाबू जत्तन, पत्रकार दीपक हिरे, वनपाल जगदीश पाटील, तलाठी कार्यलयाचे कोतवाल सुनील कामडी, अमोल पाटील, कृष्णा, नामदेव बोद्रे, प्रदीप जाधव, कृष्णा हेगडे, अरुण घरत, कृपेश पाटील, सुधाकर जाधव, प्रकाश भानुशाली, प्रवीण शेट्टी, पोलिस पाटील लक्ष्मण हाडळ, हेमंत वाकले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.