
अखेर जलतरण तलाव सुरू
विरार, ता. २२ (बातमीदार) : कोविडच्या काळात मार्च २०२० पासून विरार येथील स्वीमिंग पूल शासन निर्देशाप्रमाणे बंद करण्यात आला होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये रविवारी (ता. १९) प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर बुधवारपासून हा जलतरण तलाव सुरू करण्यात आला आहे. नागरिक आणि खेळाडूंसाठी फॉर्मचे वाटपही सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.
शासन निर्देशाप्रमाणे पूल बंद करून प्रशासनाने या तरण तलावामधील १९ लाख लिटर पाणी बाहेर काढले होते. पाणी काढल्याने तरण तलावामधील लावलेल्या टाईल्सला उन्हामुळे तडा गेल्याने गळती झाली. तसेच तो वापरात नसल्याने अनेक साहित्य नादुरुस्त झाले. फिल्टरेशन प्लांटदेखील नादुस्त झाला. परिणामी तरण तलाव वापरात नसल्याने तसेच फिल्टरेशन पूर्ण प्लांट खराब झाल्याने दुरुस्तीचे आदेश व निविदा प्रक्रिया झाली. याकरिता जवळपास एक वर्ष कालावधी लागला. दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ३० लाखांहून अधिक खर्च झाला आहे.