
अमर कोर विद्यालयात ‘इंग्लिश डे’
मुंबई, ता. २३ ः भांडुप येथील अमर कोर विद्यालयामध्ये ‘भारतीय सण–उत्सव’ या विषयावर ‘इंग्लिश डे’ साजरा करण्यात आला. मराठी माध्यमाच्या या शाळेतील पाचवी ते नववीच्या १८० विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधला आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या मुलांइतके आत्मविश्वासाने आपले विचार इंग्रजी भाषेत मांडतात, याचा प्रत्यय आणून दिला.
‘भारतीय सण-उत्सव’ या विषयांतर्गत गुढीपाडवा, ईद ए मिलाद, रक्षाबंधन, आषाढी एकादशी, गोपाळकाला, नवरात्री, दिवाळी, नाताळ, मकर संक्रात, होळी इ. सण व उत्सव यांचे महत्त्व मुलांनी विशद केले. विद्यार्थ्यांनी संभाषण, नाटक, नृत्य तसेच माहितीच्या आधारे पारंपारिक वेशात या विषयावर इंग्रजीतून माहितीचे सादरीकरण केले.
प्रथम भाषा इंग्रजी स्वीकारणारी मराठी माध्यमाची प्रथम शाळा म्हणून अमर कोर विद्यालयास सन्मान प्राप्त झाला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे जनरल सचिव मा. ना. म्हात्रे यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले. या वेळी संस्थेचे सचिव जीवन म्हात्रे, सभासद गावकर, शैलजा ठाकूर तसेच मुख्याध्यापक हांडे, पर्यवेक्षिका मोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अजय पवार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.