दिघा रेल्‍वेस्‍थानक सुरू होण्याआधीच अतिक्रमण

दिघा रेल्‍वेस्‍थानक सुरू होण्याआधीच अतिक्रमण

वाशी, ता.२२ (बातमीदार) : ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानक सुरू होण्याआधीच आजूबाजूच्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी रेल्वे स्‍थानकाबाहेरील पदपथ तसेच मोकळ्या जागेवर अतिक्रमण सुरू केले आहे. याठिकाणी व्यवसाय करता यावा, यासाठी जागा अडवण्यासाठी आतापासून फेरीवाल्यांनी खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यास सुरुवात केली आहे. तर आगामी पालिका निवडणुका बघता, इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या कशा लागतील, यासाठी फिल्डिंग लावत आहेत. फेरीवाल्याची गाडी लावण्यावरून एकमेकांशी वादावादीही होत आहे. दिघा रेल्वे स्थानक परिसरात आधीच वाहतूक कोंडीची समस्या होणार असल्यामुळे फेरीवाल्यावर आतापासूनच अंकुश ठेवावा, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा थांबा व वेळापत्रक नियोजनाकरिता एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला असून महिनाभरात लोकल दिघा रेल्वे स्थानकात थांबण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना याचा फायदा होणार आहे.

दिघा रेल्वे स्थानकांसाठी ठाणे-बेलापूर मार्गाकडे पूर्व व पश्चिमेस तिकीट खिडक्या देण्यात आल्या असून एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराच्या बाजूला खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यासाठी आतापासूनच स्थानिक राजकीय नेत्यांच्या माध्यमातून स्पर्धा सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने स्थानिक रहिवासी आपल्या गाड्या कशा लागतील, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
---------------------
भविष्‍यात स्‍थानकाला फेरीवाल्याचा गराडा ?
एकदा रेल्वे स्थानक सुरू झाले, की प्रवाशांची वर्दळ वाढेल, त्‍यानंतर हातगाडी लावण्यास जागा उपलब्ध होणार नसल्यामुळे आतापासूनच हातगाडी लावून जागा बळकविण्याचा प्रयत्न अनेकांकडून करण्यात येत आहे. तर काही जण महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून गाडी लावण्याचा प्रयत्न करीत असल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात स्‍थानकाला फेरीवाल्याचा गराडा पडण्याची शक्‍यता असून वाहतूक कोंडीत अधिकच भर पडणार आहे. यासंदर्भात अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनिगीरी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com