
‘पालघरमध्ये कामगार रुग्णालय उभारा’
पालघर, ता. २२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत बोईसर येथे आहे. तर वसई, विरार, वालिव पालघर, डहाणू, वाडासह आच्छाड येथे हजारो उद्योगाच्या माध्यमातून लाखो कामगार काम करीत आहेत. पण अपघातांमुळे किंवा वेळीच उपचार न मिळाल्याने शेकडो कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे लाखो कामगारांचे ईएसआयसाठी मोठा निधी कामगार कल्याण विभागाकडे जमा होत आहे. पण त्यांना हक्काचे कामगार रुग्णालय जिल्ह्यात सुरू झालेले नाही. त्यामुळे कामगारांना त्याच्या हक्काचे व प्रस्तावित असलेले दीडशे खाटांचे रुग्णालय मिळावे, याकरिता जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच तेथे कामगारांसोबत सर्वसामान्यांनाही किमान तीस टक्के जागा राखीव असावी, या मागणीकरिता शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांनी निवासी जिल्हाधिकारी किरण महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले.