
अनुसूचित जातीचे वर्गीकरण करा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्यातील एका विशिष्ट जातीलाच अनुसूचित जातीचे फायदे वर्षानुवर्षे मिळत आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण झालेच पाहिजे. त्यासोबतच साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करावी, या मागणीसाठी आज मातंग समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन केले. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन केले. विविध जातींचे प्रतिनिधित्व असलेल्या सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली हे ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.
अनुसूचित जातीमध्ये १३ टक्के आरक्षणात महाराष्ट्रातील ५९ जाती आहेत. अनुसूचितच्या ५९ जातींमध्ये फक्त एकाच जातीला आरक्षणाचे फायदे मिळतात. इतर ५८ जातींमध्ये आरक्षणाचा सर्वांगीण अभ्यास होणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने हा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमण्याची गरज आहे. या अभ्यासाच्या निमित्ताने अनुसूचित जातींचे प्रगत, कमी प्रगत, मागास, वंचित अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वर्गीकरण करण्यात यावे. तसेच सर्वांत मागास वर्गाला या आरक्षणात प्राधान्य देण्याची मागणी सकल मातंग समाजाकडून करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे वर्गीकरण व्हावे, अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली.
बार्टीच्या तत्त्वावर साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी, आर्टी संस्थेच्या माध्यमातूनच निधीची तरतूद करण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांपैकी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी तसेच खासदार आणि आमदारांनीही हजेरी लावल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.