
यिनचे नेतृत्व लोकांपर्यंत पोहोचले ः सम्राट फडणीस
मुंबई, ता. २२ ः यिनमधून तयार होणारे तरुण कोणत्याही क्षेत्रात गेले तरी त्यांना नेतृत्वाचे, जबाबदारी घेण्याचे धडे मिळावेत, हा यिनचा हेतू आहे. कोविडकाळात याच तरुणांनी इंटरनेटमार्फत अन्य लोकांना मदत केली. यिनचे नेतृत्व लोकांपर्यंत पोहोचते आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे मत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांनी व्यक्त केले.
यिनच्या अधिवेशनात त्यांनी ‘सकाळ’च्या समाजोपयोगी उपक्रमांचे दाखले दिले व तरुणांना मार्गदर्शनही केले. आजच्या पिढीसमोर आदर्श नाहीत, असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्या आसपास जे आदर्श असतात, त्यांना समाजासमोर आणण्याचे काम करणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. त्यासाठीच यिनची स्थापना करण्यात आली, असेही ते म्हणाले. सध्याचा समाज संक्रमणावस्थेतून जात असल्यामुळे प्रत्येक समाज घटकाच्या गरजा, काळजी यांचा विचार करून त्या धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘सकाळ’ची भूमिका महत्त्वाची ठरते. याचाच एक भाग म्हणजे हे यिनचे अधिवेशन आहे. येथून तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेतृत्वाचे धडे मिळावेत, मग ते भले कोणत्याही क्षेत्रात असोत, ते जेथे जातील तेथे त्यांनी जबाबदारी घ्यावी, नेतृत्व करावे, हा यिनचा स्थापनेपासूनचा हेतू असल्याचेही फडणीस यांनी सांगितले.
...
महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेऊन या मंत्रिमंडळाची स्थापना करून यिनच्या कामाला सुरुवात झाली. त्या मुलांना त्या त्या विभागाचे प्रशिक्षण दिले, विभागांचे काम कसे चालते, प्रश्न काय असतात, प्रश्न कसे सोडवावेत, याचेही शिक्षण दिले. त्यासाठी समाजात चांगले काम करणाऱ्या माणसांना निवडून त्यांच्या अनुभवाची शिदोरी तरुणांपर्यंत पोहोचवणे, असे यिनचे स्वरूप आहे, असे सम्राट फडणीस म्हणाले.