
फलाट लांबी वाढवण्याचे काम लवकरच सुरू
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कसारा आणि कर्जत रेल्वे मार्गावर १५ डब्यांची लोकल लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वेस्थानकामधील फलाट लांबी, शेडची कामे आगामी तीन ते चार महिन्यांत सुरू केली जातील, असे आश्वासन मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी कल्याण-कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वेस्थानकादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना येणाऱ्या समस्यांवर कल्याण-कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे एक दिवसीय आंदोलन होणार होते. मात्र ते रद्द करत रेल्वे प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी संघटनेचे राजेश घनघाव, श्याम उबाळे, विशाल जाधव, विजय देशेकर, आरती भोईर आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. फलाट आणि लोकल यांच्यामधील दरी, नवीन पादचारी पूल मंजुरी, शेड, शौचालय, सरकते जिने, लिप्ट, लोकलमधील डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, असे गोयल यांनी सांगितले.