
भिवंडीत शिवजयंती उत्सव उत्साहात
भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : शहरातील ज. ए. इ. च्या प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्सव साजरा केला. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले. प्राथमिक शाळेच्या पटांगणात आयोजित केलेल्या उत्सवाचे उद्घाटन स्व. दादासाहेब दांडेकर ट्रस्टचे राजेश कुंटे व शालेय समितीचे अध्यक्ष अनंत हेंडर भगत यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
शिवजयंतीच्या निमित्ताने या पटांगणात विद्यार्थ्यांनी मातीचा तसेच पुठ्याचा किल्ला बनविला होता. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील शिवाजी जन्मापासून विविध प्रसंग साकारून छत्रपतींचा इतिहास जागविला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेश कुंटे यांनी सांगितले की, पैशाने कोणी मोठा होत नाही तर समाजासाठी व देशासाठी जो व्यक्ती काम करेल ती व्यक्ती मोठी होते. शिवकाळात देखील श्रीमंत व्यापारी होते. पण ते मोठे झाले नाहीत तर देशातील लोकांसाठी प्राणपणाने लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण साडेतीनशे वर्षानंतर देखील त्यांची जयंती साजरी करतो. त्याप्रमाणे आपल्या अंगी असलेल्या गुणांचाही देशासाठी उपयोग करा, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला. शिवजयंतीचे व नाटिकांचे प्रवेश सादर करण्यासाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालकवर्ग यांनी मेहनत घेतली.