आसनगावात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसनगावात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
आसनगावात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

आसनगावात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

sakal_logo
By

खर्डी, ता. २३ (बातमीदार) : आसनगाव स्थानकाबाहेर शहापूरकडे जाणाऱ्या पूर्व बाजूला छोटा रस्ता असल्याने व त्यावर दाटीवाटीने रिक्षा उभ्या रहात असल्याने लोकल ट्रेन आल्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे रोज पूर्ण वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना चालणेही मुश्किल होत असल्याने येथे रोज वादाचे रूपांतर भांडणात होत आहे. यावर उपाय म्हणून नव्या पुलाला जोडून जुन्या मुंबई-आग्रा महामार्गाच्या बंद असलेल्या रेल्वे फाटकापर्यंत स्कायवॉक बनवण्याची गरज असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
स्थानिक खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा करण्याची गरज आहे. जेणेकरून प्रवाशांना स्कायवॉकवरून ये-जा करता येईल व वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही. आसनगाव स्थानकाच्या पूर्वेस शहापूर तालुका आहे. तालुक्यातील आसपासच्या गावातून रोज हजारो विद्यार्थी व नागरिक रोजीरोटी कमवण्यासाठी मुंबई, कल्याण, ठाणे व उल्हासनगर येथे लोकलने ये-जा करीत असतात. पूर्वेस रेल्वेला जोडून असलेल्या पुलाला चिकटूनच २/३ रांगेत रिक्षा दाटीवाटीने उभ्या असल्याने लोकल ट्रेन आल्यावर एकाच वेळी गर्दी होत असते. त्यात तिथूनच पुढे रस्ता जात असल्याने मोठमोठी वाहने, पाण्याचे टँकर, जिप, कार व बस यांची याच १० फूट रुंद असलेल्या रस्त्यावर ये-जा सुरू असल्याने विद्यार्थी व प्रवाशांना पायी चालणेही मुश्किल होत असते.

--------------
पूल पूर्ण करण्याची मागणी
आसनगाव स्थानकातील कसाऱ्याच्या बाजूचा पूल अर्धवट अवस्थेत पाडून तो बंद केल्याने प्रवाशांना हेलपाटे मारावे लागत आहेत. हा पूल पूर्ण करून तो तयार केल्यास प्रवाशांना ये-जा करताना त्रास कमी होईल. यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रवाशांतून बोलले जात आहे.

---------------
आसनगाव रेल्वे स्थानकात स्कायवॉकची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
- शिवाजी सुतार, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

------------------
आसनगाव स्थानकातून रेल्वे फाटक बंद असलेल्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गापर्यंत स्कायवॉक केल्यास चालत जाणाऱ्या प्रवाशांना सोईचे होईल. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.
- वैष्णवी जाधव, विद्यार्थिनी

खर्डी : आसनगाव स्थानकातील अर्धवट अवस्थेत तोडलेला ब्रिज.