वार्तापत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्तापत्र
वार्तापत्र

वार्तापत्र

sakal_logo
By

वार्तापत्र
पालघर काबीज करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

प्रकाश पाटील

पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपचे बरीच वर्षे वर्चस्व होते; परंतु गेल्या निवडणुकीत युतीमध्ये सेनेने हा मतदारसंघ भाजपकडून घेतला. मध्यतरीच्या काळात राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सेना भाजपची युती तुटल्याने भाजपने आता पालघर काबीज करण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी पालघर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला होता. त्यात मालाड ते पालघर हा भाग उत्तर मुंबई लोसभा मतदारसंघात येत होता. दुसरा भाग हा डहाणू मतदारसंघात येत होता. त्यावेळच्या डहाणू मतदारसंघावर भाजपचे सर्वात जास्त काळ प्रभुत्व राहिले होते. उत्तर मुंबई मतदारसंघातून राम नाईक; तर डहाणू लोकसभा मतदारसंघातून चिंतामन वनगा हे भाजपचे उमेदवार निवडून येत होते. नव्याने पालघर लोकसभा मतदारसंघ झाल्यावर याठिकाणी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे खासदार झाले. पण त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या चिंतामण वनगा यांनी पराभव केला आणि ह्या भागावर भाजपचे असलेले वर्चस्व पुन्हा प्रस्तापित केले. चिंतामन वनगा यांच्या निधनानंतर १ वर्षासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये येऊन राजेंद्र गावित हे खासदार झाले होते.

गेल्या निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा दाखल केला. त्या बदल्यात त्यांनी बोईसर विधानसभा भाजपला दिली. त्यावेळी पुन्हा एकदा भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमधून शिवसेनेत उडी घेऊन खासदारकी लढवली आणि ते जिंकून आले. गेल्या चार वर्षात राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून भाजप सेना युती तुटली. त्यानंतर आता सेनेतही फूट पडली आहे. शिवसेनेचे खासदार राहिलेल्या गावित यांनी उद्धव ठाकरेंची संगत सोडून एकनाथ शिंदेंना साथ दिली. सेनेत झालेल्या फुटीनंतर भाजपने परत एकदा पालघर लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. त्यामुळे या वेळी पालघर लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ होण्याची श्यक्यता राजकीय निरीक्षकडून व्यक्त करण्यात येत आहे.