दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचा जागर
दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचा जागर

दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचा जागर

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ (बातमीदार) ः मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट, तसेच मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाच वाजता धुरू हॉल, पहिला मजला, छबिलदास लेन, दादर पश्चिम येथे हा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जगविख्यात ज्येष्ठ न्यूरो स्पायनल सर्जन डॉ. पी. एस. रामाणी, मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे, उद्योजक किशोर जाधव, लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी मराठी भाषेचे गाढे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री सादर करणार आहेत; तर अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव ‘केवलप्रयोगी’ आणि साने गुरुजी शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील मराठी भाषा गौरव दिन महती सांगणारी चित्रफीत सादर केली जाणार आहे. या प्रसंगी सुरुवातीला ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि संघाचे माजी प्रमुख कार्यवाह दिवंगत शरद वर्तक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. त्यानंतर प्रदीप कर्णिक यांचा, वाचन चळवळीतील योगदानाबद्दल ‘दत्ता कामथे स्मृती’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे; तर मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहासप्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवावृत्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच वेळी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक यांना सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे; तर संघातर्फे आयोजित विविध स्पर्धातील विजेत्यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.