
पदपथावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
भांडुप, ता. २३ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम एल. बी. एस. मार्ग परिसरात जागोजागी मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पदपथांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. या समस्यांबाबत ‘सकाळ’ने ‘अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण’ या शीर्षकाखाली बुधवारी (ता. २२) वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पालिकेने बातमीची दखल घेत लगेचच पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. या ठिकाणाहून अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या लोखंडी पेट्या, डंबेल्स, लोखंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ताब्यात घेतले आहे.
भांडुप पश्चिमेला असलेल्या ड्रीम्स मॉल गेटच्या समोरील पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. या ठिकाणी लोखंडाच्या वस्तू विकल्या जात होत्या. विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू ठेवण्यासाठी याच ठिकाणी मोठ्या लोखंडी पेट्या ठेवल्या असल्याचे दिसत होते. परिणामी प्रवाशांना ये–जा करण्यास गैरसोयीचे झाले होते. ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पालिकेने पदपथ मोकळा केला आहे. यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.