
चाकरमान्यांच्या खिशाला कात्री
ठाणे, ता.२३ (वार्ताहर) : ठाणे स्टेशन परिसरात प्रवाशांची गर्दी, कर्णकर्कश आवाज करीत धावणाऱ्या रिक्षा, स्टेशन परिसरात येणारे पादचारी आणि रस्त्यात ठिकठिकाणी उभे असलेल्या शेअर रिक्षा अशा कोंडलेल्या वातावरणात ठाणेकरांचा श्वास घुसमटतो. यामधून मार्ग काढण्यासाठी बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या रिक्षांना चाप लावण्याचा प्रयत्न ठाणे वाहतूक पोलिसांनी केला आहे. याबाबत शेअर रिक्षाचालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. भविष्यात शेअर रिक्षा बंद केल्यास मात्र चाकरमान्यांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
अस्ताव्यस्त आणि स्थानक परिसरात बेशिस्तपणे उभ्या असलेल्या शेअर रिक्षांमुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. ठाणे वाहतूक शाखेने शेअर रिक्षाचालकांमध्ये शिस्त यावी म्हणून हे पाऊल उचलले आहे; मात्र अद्याप शेअर रिक्षाचालक आणि रिक्षा संघटनांकडून याला तीव्र विरोध दर्शविण्यात आलेला नाही. भविष्यात शेअर रिक्षाचालक मात्र आंदोलन किंवा शेअर रिक्षा बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शेअर रिक्षाचालकांच्या व्यवसायावर नव्या निर्णयामुळे फरक पडणार आहे. जर शेअर चालकांनी रिक्षा बंद केल्यास त्याचा परिणाम हा सर्वसामान्य चाकरमान्यांवर होणार आहे. ठाणे स्थानकावरून घोडबंदर, शिवाजीनगर, कळवा, मिरा-भाईंदर, भिवंडीसारख्या लांबपल्ल्याच्या ठिकाणी जाणारा प्रवासीवर्ग आहे. शेअर रिक्षांमुळे त्यांना प्रवास करणे हे परवडणारे ठरते. शेअर रिक्षा बंद केल्यास हजारो चाकरमान्यांना स्वतंत्रपणे रिक्षाने प्रवास करणे हे आर्थिकदृष्ट्या खर्चिक पडणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ===================================
ठाणे स्थानकावरून भिवंडीकडे जाण्यासाठी शेअर रिक्षा फायद्याची ठरते. बस किंवा एसटी भाड्याव्यतिरिक्त पैसे द्यावे लागतात; मात्र वेळेची बचत होते. जलद प्रवास होतो; अन्यथा ठाणे स्टेशनवरून शेअर रिक्षाने जाणे खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे शेअर रिक्षा परवडणारी ठरते.
- प्रमोद दळवी, चाकरमानी
==================================
कामाला जाताना रेल्वेचा प्रवास होत नाही; पण शेअर रिक्षाने रोज प्रवास करावा लागतो. ७०-८० रुपयांचे भाडे देणे महाग पडते; मात्र शेअर रिक्षाने खर्च ३० रुपयांच्या आसपास होतो. ४० रुपयांची बचत होते आणि वेळेचीही बचत होते.
- अनिरुद्ध कदम, कळवा
====================================
कामावरून आल्यानंतर ठाणे स्टेशनवरून घोडबंदर जाण्यासाठी एसटी, बेस्ट बस, परिवहन बस हे विविध पर्याय आहेत. मात्र शेअरिंग रिक्षा या स्टेशनबाहेर मिळतात. कमी पैशात इच्छित स्थळी पोहचवितात.
- अभिजित पलांडे, घोडबंदर
===================================
ठाणे स्थानकावरून नवीन ठाणे येथे जाण्यासाठी बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शेअर रिक्षा उपयोगी पडतात. जलद प्रवास आणि कमी पैशात हा प्रवास होतो. मीटरवर रिक्षा नेणे किंवा प्रवास करणे खूपच खर्चिक आहे. त्यामुळे शेअर रिक्षाने प्रवास हा फायद्याचा ठरतो.
- स्वप्नाली सावंत, महिला कर्मचारी