कर्जतमध्ये पुन्हा राजकीय शिमगा

कर्जतमध्ये पुन्हा राजकीय शिमगा

नेरळ, ता.२३ (बातमीदार)ः कर्जत तालुक्यातील शेलू येथील पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात कर्जत-खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या व्यक्तव्यावरून कजर्तमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून माजी आमदार सुरेश लाड यांनी देखील थोरवे यांना खुल्या चर्चासत्राचे आव्हान देणारे बॅनर शहरात झळकावले आहेत. त्यामुळे विकासकामाच्या उद्घाटन सोहळ्यातून सुरू झालेल्या या वादामुळे नवा राजकीय संघर्षांची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे.
शेलू येथील निकोप मोहिली या गावांना जोडणारा पुलाचे उद्घाटन नुकतंच आमदार थोरवे यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. कर्जत-खालापूर या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी या तालुक्यांसाठी शासनाकडून मंजूर केला आहे. त्यामुळेच मी मंजूर आणलेल्या कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण माझ्या हातूनच होत आहे. आधीच्या लोकप्रतिनिधींनी फक्त प्रशासकीय मंजुरी आणण्याचं काम केलं, मात्र काम त्यांना काही करता आली नाही. पण आता कर्जत-खालापूरचा विकास वेगाने होत आहे. हा विकास विरोधकांना पाहवत नाही. त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केले होते. त्यावरून आता माजी आमदार सुरेश लाड देखील आक्रमक झाले असून त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना खुल्या चर्चेचे आवाहन दिले आहे. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी मात्र कोणतेही प्रतिउत्तर अद्याप तरी दिलेले नाही.
--------------------------------------------------
राजकीय वादाची मालिका
२७ मे २०२१ रोजी कर्जत येथे प्रशासकीय भवन भूमिपूजनावेळी देखील असाच वाद उफाळून आला होता. प्रशासकीय भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यापूर्वीच माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी प्रशासकीय भवनाचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असताना आघाडीत-बिघाडीचा इशारा थोरवे यांनी दिला होता. त्यानंतरच झालेल्या सत्तांतर नाट्यात महाविकास आघाडीला कर्जतमध्ये सुरुंग लागला होता.
--------------------------------------------------
शहरात ‘होऊ द्या चर्चा’चे बॅनर
गेल्या १५ वर्षात मी काही काम केली की नाही, यावर खुली चर्चा कर्जत शहरातील टिळक चौकात जनतेसमोर होऊ द्या. कर्जतकर नागरिकांसमोर होणाऱ्या या चर्चेसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी तारीख वार वेळ द्यावी, असे खुले आव्हान आता माजी आमदार लाड यांनी दिले आहे. याच अनुषंगाने कर्जत तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ असे बॅनरची देखील झळकावले आहेत. त्यामुळे गेल्यावेळी भूमिपूजनावरून तर यावेळी उदघाटनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com