शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मारकात अखंड तेवत रहाणार अमर जवान ज्योत

शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मारकात अखंड तेवत रहाणार अमर जवान ज्योत

भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या मिरा रोडच्या मेजर कौस्तुभ राणे यांच्या शौर्याला सलाम करणारे शहीद स्मारक मिरा रोड येथे उभे करण्यात आले आहे. या स्मारकात ‘अमर ज्योत’ स्थापित करण्यात आली असून ही अमर ज्योत अखंड तेवत राहणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीला कौस्तुभ राणे यांच्या जयंतीच्या दिवशी स्मारक व अमर ज्योतीचे उद्‌घाटन केले जाणार आहे.
काश्मीरमध्ये ७ ऑगस्ट २०१८ रोजी दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे हुतात्मा झाले. ते मिरा रोड येथे राहत होते. कौस्तुभ राणे यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात, यासाठी शहरात ‘शहीद स्मारक’ तयार करण्याची संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली. या संकल्पनेतूनच मिरा रोडच्या कनाकिया भागात हे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात अमर ज्योत अखंडपणे तेवत राहणार आहे. कौस्तुभ राणे यांचा ७ ऑगस्ट हा शहीद दिवस आहे. त्यामुळे याच दिवशी त्यांच्या शहीद स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या कामाचे भूमिपूजन कौस्तुभ राणे यांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्मारकासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विशेष निधीतून एक कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे.
स्मारकाचे व अमर ज्योतीचे उद्‌घाटन २७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, अखिल भारतीय दहशतवादविरोधी मोर्चाचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाला कौस्तुभ राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे व वीरपिता प्रकाशकुमार राणे तसेच संपूर्ण राणे कुटुंबीय उपस्थित रहाणार आहे. महापालिकेचे अग्निशमन दल व पोलिस बँड यांच्या माध्यमातून यावेळी मानवंदना दिली जाणार आहे.

‘शौर्याची आठवण करून देईल’
स्मारकामध्ये अखंड तेवत राहणारी ज्योत शहीद मेजर कौस्तुभ राणे यांची आणि त्यांच्या शौर्याची कायम आपल्याला आठवण करून देईल. ही तेवणारी ज्योत प्रत्येक तरुण पिढीला कौस्तुभ राणे यांच्या सर्वोच्च त्याग, बलिदानाची आठवण करून देईल, त्यातून येथे येणाऱ्या प्रत्येकाला तसेच येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल. शहिदांच्या स्मृती येथे जागवल्या जातील, अशी भावना आमदार सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
---------------------------

भाईंदर : शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मारकाचे संकल्पचित्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com