गोवंडी कला महोत्सवाची उत्साहात सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडी कला महोत्सवाची उत्साहात सांगता
गोवंडी कला महोत्सवाची उत्साहात सांगता

गोवंडी कला महोत्सवाची उत्साहात सांगता

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : गोवंडी म्हटले की झोपडपट्टी, अस्वच्छता, प्रदूषण असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. मात्र गोवंडीमध्ये कलाकार, चित्रकार आणि सृजनशील लोकांची कमी नाही. या सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा गोवंडी कला महोत्‍सव नुकताच पार पडला. चित्तथरारक रॅप, थिएटर परफॉर्मन्स, नृत्य आणि आपल्या अदाकारीने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. गोवंडीत नटवर पारेख कम्पाऊंड येथे या महोत्सवाची नुकतीच सांगता झाली.
गोवंडी परिसरातील कित्येक वर्षांपासून आपल्या कला-गुणांपासून वंचित राहिलेल्या तरुण व तरुणींनी उत्स्फूर्तपणे या कला महोत्सवात सहभाग घेतला. गोवंडी परिसरातील व आजूबाजूच्या स्लम परिसरातील मुलांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन मिळवून देण्याच्या उद्देशाने कम्युनिटी डिझाईन एजन्सी व ब्रिटिश कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसांच्या गोवंडी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोवंडीतला हा पहिलाच कला महोत्सव होता. गोवंडीतील ४५ तरुणांना नाट्य, चित्रपट निर्मिती, छायाचित्रण, सार्वजनिक कला आणि रॅपमधील मुंबईस्थित नामवंत कलाकारांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या मुलांनी व रहिवाशांनी रेखाटलेली चित्रे, मातीच्या कलाकुसरीच्या वस्तू, कंदील पाहून कलाकारांची कल्पकता दिसून येत होती.
या कला महोत्सवात मुलांनी विविध गाण्यांवर सादर केलेली नृत्य, नाटक, एकपात्री अभिनय व पथनाट्य म्हणजे एक जल्लोष होता. सुप्रसिद्ध महिला रॅपर सानिया एमक्यू हिने या महोत्सवाला हजेरी लावून शेवटच्या दिवशी एक सरप्राईज परफॉर्मन्स दिला. कित्येक वर्षांपासून कलेपासून वंचित राहिलेल्या मुलांना आपली कला सादर करता आल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास त्यांच्यात पाहायला मिळत होता.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका निहारिका लिरा दत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हक से गोवंडी’ या नाटकाच्या थिएटर मेंटॉरशिप ग्रुपच्या सादरीकरणासह मोठ्या उत्साहात या कला महोत्सवाची सांगता झाली. कला महोत्सवात गोवंडी भागातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा महोत्सव यशस्वी केला.

गोवंडी कला महोत्सवातील सहभाग हा प्रत्येकासाठी एक अविश्वसनीय आणि आनंददायी अनुभव होता. या मंचाच्या माध्यमातून तरुणाईने त्यांची सृजनशीलता दाखवून दिली आहे.
- संध्या नायडू, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक
कम्युनिटी डिझाईन एजन्सी

आमची संस्था भारत आणि इंग्लंडमधील कलाकार आणि कला संस्था यांच्यातील सहकार्य आणि संवाद घडवून आणते. उदयोन्मुख लोकांसाठी अधिक कलात्मक देवाणघेवाण आणि जागतिक संधींसाठी एक व्यासपीठ म्हणून आम्ही काम करतो. गोवंडी कला महोत्सव हा यासाठी एक मोठे माध्यम ठरले आहे. हा महोत्सव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यात उपक्रमांसाठी मार्ग प्रशस्त करेल.
- राशी जैन, संचालक पश्चिम भारत, ब्रिटिश कौन्सिल

आम्हाला महोत्सवात सहभागी होऊन कला दाखवता आली याचा खूप आनंद आहे.
- बाबू शेख, विद्यार्थी