ब्रेकअप ला फार मानावर घेऊ नका

ब्रेकअप ला फार मानावर घेऊ नका

मुंबई, ता. २३ ः ब्रेकअप म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेत आपण बसत नाही, एवढाच अर्थ असतो. आपण वाईट आहोत, असा ब्रेकअपचा अर्थ होत नाही. आपण ज्याच्या अपेक्षेत बसतो, असे नक्कीच दुसरे कोणीतरी असते. त्यामुळे ब्रेकअप फार गंभीरपणे घेऊ नका आणि ब्रेकअपमुळे आत्महत्या करणे, हा तर मूर्खपणा आहे, असा तरुणांना पटणारा सल्ला आत्मसंतुलन केंद्राचे संचालक सुनील तांबे यांनी आज येथे दिला. जीवनसाथी कसा निवडावा, नातेसंबंध कसे असावेत, या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने प्रश्नांना उत्तरे दिली.
जीवनसाथी निवडण्याची पहिली पायरी म्हणजे स्वार्थी व्हा आणि निवडल्यानंतरची पायरी म्हणजे निःस्वार्थी व्हा, असे गमतीदार, पण अत्यंत मार्मिक उत्तर त्यांनी दिले. जोडीदार निवडताना प्रथम आपली गरज, अपेक्षा, चॉईस ठरवा. यात स्वतःला फसवू नका, आपल्या अपेक्षा, आपली पसंती न लाजता सांगा. आपल्याला अनुरूप जोडीदार निवडा. सौंदर्य, स्वभाव, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी यातील कोणत्याही एकाच गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका. एकदा आपल्या जोडीदार निवडल्यावर दुसरी पायरी म्हणजे आपला स्वार्थ सोडून द्या. जोडीदाराच्या गरजा, त्याचे मन याकडे लक्ष द्या, आपले प्रेम त्याला जाणवले पाहिजे, त्यासाठी हवी तर थोडीशी तडजोडही करा, असा सल्ला तांबे यांनी दिला. उदाहरणार्थ संतती नियमनासाठीच्या गोळ्यांचा स्त्रियांवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संतती नियमनाची जबाबदारी पुरुषाने स्वतःवर घेतली पाहिजे. हा बायकोचा प्रश्न आहे, असे कोणा पुरुषाने म्हणून ही बाब झटकून टाकली, तर तो तुमचा आयुष्याचा जोडीदार नाही, याची ठाम खूणगाठ बांधा, असेही ते म्हणाले.
...
करियरमध्ये सासूची मदत
हल्ली अरेंज मॅरेजमध्ये मुलींना सासू-सासऱ्यांचे संयुक्त कुटुंब नको असते. त्यांना स्वतःचे छोटे कुटुंब हवे असते; मात्र महिलांना करिअर करायचे असेल, तर मुलांना कोणी सांभाळावे, हा प्रश्न असतो; मग अशा स्थितीत थोडा त्याग करून सासूची दोन बोलणी ऐकून घ्यायची तयारी ठेवावी. एरवीही नवरा आपल्याला टोमणे मारतो, ते आपण ऐकून घेतोच ना, असेही गमतीदार उदाहरण त्यांनी दिले.
...
जोडीदाराला स्वातंत्र्य द्या!
मैत्री लग्नात बदलली की कधीकधी असुरक्षिततेपोटी भीतीही येते. आपल्या जोडीदार सोडून जाईल का, अशी चिंता असते. त्यामुळे आपण समोरच्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. याने जोडीदार उलट वैतागून दूर जातो. त्यामुळे आपल्या जोडीदाराला स्वातंत्र्य द्या. त्यातूनही तो निघून गेला, तर तो तुमचा नव्हताच, हे सिद्ध होईल, असेही तांबे म्हणाले.
...
पाळीच्या दिवसात विश्रांती घ्या!
हल्ली अनेक महिलांना गर्भधारणेत समस्या येतात. महिला घेत असलेल्या संतती नियमनाच्या गोळ्या यास काही प्रमाणात कारणीभूत आहेतच; पण मासिक पाळीच्या दिवसांतही महिलांनी स्वतःवर संपूर्ण लक्ष ठेवावे. या काळात पूर्ण विश्रांती घ्यावी, चांगले वाचन करावे, कोणताही ताणतणाव घेऊ नये, वादविवाद करू नयेत; अन्यथा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, असाही सल्ला तांबे यांनी दिला.
...
भावनिक तणाव व्यवस्थापन
समजा ब्रेक-अप झाला, तर तो का झाला, याचा आढावा घ्या. एकत्र असताना जर जोडीदाराने आपली काळजी घेतली नसेल, तर तो आपला खरा जोडीदारच नाही, हे पक्के समजा. स्वतःच्या मनाला समजवा की हा ब्रेकअप माझ्यामुळे झाला नसून त्याच्या अपेक्षा वेगळ्या असल्यामुळे झाला. कालांतराने होणारे जोडीदारामधले शारीरिक, मानसिक बदलही स्वीकारा, असाही सल्ला तांबे यांनी दिला.
...
कुटुंबासारखे सुख नाही!
हल्ली आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहात सुरुवातीला कुटुंबीयांचा विरोध होतो. अशा वेळी थोडी मेहनत घेऊन आम्ही एकत्र राहण्यास योग्य आहोत, हे घरच्यांना पटवून द्या. काही वर्षांनी सगळे सुरळीत होते. आपले कुटुंब हे महत्त्वाचे असून सुखी कुटुंबात राहणे यासारखे सुख नाही, असे सुखाचे रहस्यही त्यांनी सांगितले. लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडीदाराचे तुकडे करून फ्रीजमध्ये कोंबल्याच्या एका घटनेचा उल्लेख करताना एकमेकांबद्दल सन्मान, आदर कमी होऊन एकमेकांचा वापर करणे, ही भावना समाजात वाढते आहे; पण हे प्रेम नाही, असे तांबे यांनी सांगितले.
...
ओंकाराचा जप
विशिष्ट फोकस ठेवून नात्यांवर भर दिला तर नाते टिकेल. त्यासाठी रोज पाच मिनिटे ओंकाराचा जप करा. ओंकाराचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, अन्य धर्मीयही त्यांच्या धर्मातील पवित्र शब्दांचा वापर करू शकतील. त्यामुळे प्राणायाम होईल आणि मनही शांत होईल. मनावर, अहंकारावर ताबा ठेवण्यासाठी ओंकार जप अत्यंत सुंदर आहे, असेही तांबे यांनी सांगितले. या वेळी त्यांनी स्वतः ओंकार जप करून यिनच्या तरुणांनाही त्यात सहभागी होण्यास सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com