
खरा नेता तोच जो कार्यकर्त्यांमध्ये राहतो
मुंबई, ता. २३ ः राजकारणात बदल झाला आहे. आधी चळवळीतून कार्यकर्ते येत होते. आता थेट पक्षाचे कार्यकर्ते येतात. यिन ही चळवळ तुम्हाला उपलब्ध झाली आहे. आताचे तरुण एखाद्या युवक नेत्याकडे आकर्षित होऊन सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून राजकारणात येताना दिसतात. माझ्या वैयक्तिक मतानुसार जो थेट राजकारणात येतो तो चांगला नेता किंवा कार्यकर्ता होऊ शकत नाही. त्यासाठी स्वतः चळवळीतून यावे लागते. खरा नेता तोच जो कार्यकर्त्यांमध्ये राहतो, असे प्रतिपादन शिवसेना नेते डॉ. अद्वय हिरे-पाटील (अध्यक्ष, जिल्हा कृषी औद्योगिक संघ, नाशिक) यांनी यिनच्या कार्यक्रमात केले.
मी राजकारणात सक्रिय झालो, तेव्हा माझे वडील काँग्रेस पक्षाचे नेते होते; पण ते सत्तेत असताना सत्तेतच काम करावे, अशी माझी कधीच मानसिकता नव्हती. माझ्या प्रवासात मला अनेक परिसांचा स्पर्श झाला. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे महेंद्रसिंह टिकैत. शेतकऱ्यांसाठी मोठे नेतृत्व, आंदोलन टिकैत यांनी कायम केले. टिकैत यांच्यासोबत संपर्क झाल्यानंतर त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी व्हायला लागलो. शेतकऱ्यांसाठी लढायचे एवढेच ध्येय होते. हा शेतकरी मला उद्या मतदान करेल, ही भावना न ठेवता ज्या शेतकऱ्याला आता गरज आहे- मग ते पंजाब असो, हरियाना, दिल्ली किंवा उत्तर प्रदेश असो- त्या ठिकाणी महिनोंमहिने राहून आंदोलन करायचो. भारतीय किसान युनियनचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा महाराष्ट्रात विशेष स्थान नव्हते किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही बीकेयूचे महत्त्व नव्हते. मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा बंडी यात्रा काढली. विदर्भ ते कोकण प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या संघटनेची भूमिका मांडायची. प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. ते प्रश्न सरकारी दरबारात मांडायचे, असे करत राहिलो.
यादरम्यान, संपूर्ण महाराष्ट्र किमान चार वेळा फिरून झाला असेल. विशेषतः विदर्भात फिरत असताना नक्षलवादी लोक तुम्हाला अडवतात; पण शेतकरी संघटनेचे मुद्दे हे सरकारच्या विरोधात असतात आणि सरकारच्या विरोधातील असतील, तर नक्षलवादी लोक आपल्या सोबत असतात. त्यामुळे मला त्यांचा पाठिंबा मिळायला लागला. मी नक्षलीसमर्थक आहे, असे समजून अनेक गुन्हे दाखल केले गेले. मुंबईत आंदोलनासाठी टिकैत आले होते. माझी इच्छा होती की त्यांची मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करावी; पण त्यांनी विचारलं की, माझे कार्यकर्ते कुठे राहणार आहेत? उत्तर प्रदेशमधून लाखो शेतकरी टिकैत यांच्या शब्दाखातर मुंबईत येणार होते. त्यांना रेल्वेचा प्रवास कसा उपलब्ध करायचा, हा प्रश्न त्यांना पडला होता. तेव्हा लालूयादव हे मंत्री होते. त्यांना भेटण्यास सांगितले. शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला की रेल्वेत मोफत प्रवास करायला मिळतो, असे त्यांनी सांगितल्यानंतर लालू यादव यांच्याशी भेट झाली. बिल्ला लावून आलेल्या लाखो शेतकऱ्यांचा रेल्वे प्रवास मोफत झाला.
सर्वांना आझाद मैदानातच राहावे लागले. टिकैत यांच्या नेतृत्वातून हे कळले की, नेता तो नाही जो कार्यकर्त्यांपासून वेगळा राहतो. खरा नेता तो जो कार्यकर्त्यांमध्ये राहतो. त्यामुळे जर माझा कार्यकर्ता मैदानात राहत असेल, तर तुला आणि मला मैदानातच राहावे लागेल. पावसाचे दिवस होते. तंबू बांधला आणि तिथे राहिलो. त्यांनी स्वतः जेवण बनवले आणि मला भरवले. त्या क्षणांमधून मी कार्यकर्ता म्हणून घडलो.
...
प्रचंड वाचनाची गरज
राजकीय जीवनात काम करायचे असल्यास प्रचंड वाचनाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान असले पाहिजे. सर्व कायदे कळले पाहिजेत. सामाजिक जीवनात काम करत असताना लोक तुमच्याकडे अनेक प्रश्न घेऊन येतात. घटस्फोटापासून ते घरगुती हिंसाचारापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्हाला त्यांच्या पाठीमागे उभे राहावे लागते. पोलिस तक्रार करताना कायद्याची कलमे माहिती असायला हवीत, असेही डॉ. अद्वय हिरे-पाटील म्हणाले.
...
ऐकण्याची सवय महत्त्वाची!
नेतृत्व करायचे असेल तर ऐकून घेण्याची सवय असायला हवी. ऐकून घेतले तर ज्ञानात भर पडेल. लोकांचे म्हणणे समजून घेता येईल. जेवढे ऐकून घ्याल तेवढे जास्त समाजाचे प्रश्न समजतील. दररोजचा दिनक्रम आपल्याला माहिती नसतो. चांगला प्रशासक व्हायला शिक्षण खूप जास्त महत्त्वाचे आहे. अनेकदा ठरवलेल्या बैठकीत ठेवलेला अजेंडा काही लोकांना वाचता येत नाही. ज्याला अजेंडा वाचता येत नाही, तो त्या विषयावर चर्चा कशी करणार? तरुणपणी शिक्षण घ्या, खूप वाचा, मग चळवळीत सहभागी व्हा. मग राजकीय पक्षात जा. फक्त पदासाठी पक्षात जाऊ नये, असा सल्लाही हिरे-पाटील यांनी सदस्यांना दिला.
...
जयप्रकाश नारायण आवडते नेते
अनेकांची चरित्रे वाचल्यानंतर आपल्या जीवनात परिवर्तन होते. माझ्या आयुष्यातील सर्वात आवडते नेते जयप्रकाश नारायण हे आहेत. त्यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर संबंध आयुष्य बदलून जाते. त्यांनी आठ प्रकारचे क्रांतिमंत्र दिले. संपूर्ण क्रांती करण्याची हिंमत कुठल्याही नेत्याकडे नाही. समाज मोठा करायचा असेल, तर नुसता विकास करून उपयोग नाही. जात आणि धर्माविषयी जो विचार आहे, तोही बदलावा लागेल. आर्थिक विचारही बदलावा लागेल. कोणत्या तरी क्रांती केलेल्या नेत्याचे व्हिजन तुमच्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. त्यांच्या विचारांनी तुम्ही पुढे जा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी प्रेरित व्हा. खासदार विकत घेणे मला पसंद नाही, असे म्हणण्याची ताकद त्यांच्यात होती.
...
पक्ष खोलवर समजून घेतला पाहिजे!
एखाद्या चांगल्या कंपनीत राहणारा माणूस चांगला पगार मिळाला म्हणून नोकरी बदलतो तसेच आता राजकारणाचेही झाले आहे. जेवढ्या जास्त नोकऱ्या आपण बदलतो तेवढा जास्त पगार वाढत जातो. आता राजकारणही तसेच झाले; पण ही नोकरी बदलताना प्रत्येक पक्ष हा संस्कार आहे, स्वतंत्र धर्म आहे, त्याला खोलवर समजून घेता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधींच्या पूर्वी स्थापित झाला असला, तरी तो त्यांच्या विचारांनी प्रेरित आहे. त्यामुळे त्यांचे संस्कार, संस्कृती वेगळी आहे. भारतीय जनता पक्ष वाजपेयी आणि अडवानींच्या भूमिकेतून निघाला. जनसंघ आणि आरएसएसच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव कायम राहिला. आता मी शिवसेनेत काम करत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार होता; पण प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे विचार सारखे आहेत. ते आजोबांचे विचार घेऊन काम करतात. आज उद्धव ठाकरे यांच्या विचारातून शिवसेना चालते आणि आम्हाला त्याच भूमिकेत राहून काम केले पाहिजे. नोकरी बदलताना म्हणजेच या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना पक्षाची वैशिष्ट्ये, गुण तुमच्यात उतरले पाहिजेत. म्हणजे जी भूमिका पक्षाची आहे तीच भूमिका तुम्ही नीट केली पाहिजे. स्वतःच्या भूमिकेतून नाही, तर पक्षाच्या भूमिकेतून ते पात्र नीट निभावले पाहिजे. राजकारणाचा उद्देश पैसे, प्रतिष्ठा कमावणे हा एकीकडे असू शकतो; पण जनतेची सेवा करणे आणि जनसेवेला लाभ कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
...
पाण्यानेच खरा विकास
माझे वडील पाणी या विषयावर खूप काम करायचे. एरवीची रस्ते, गटारे ही विकासकामे काही वर्षांनी नष्ट होतील; पण सामान्यांचा खरा विकास पाण्यानेच होईल. त्यासाठी प्रत्येक गावात पाणी अडवण्याची गरज आहे. त्यामुळे शेती व रोजगाराला प्राधान्य मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. नेत्याने जनतेमध्ये मिसळणे महत्त्वाचे आहे; मात्र त्याने विकास होत नाही. कामे होण्यासाठी मंत्रालयात ठाण मांडणेही महत्त्वाचे आहे. या दोन्हींचाही समतोल साधा, असा सल्लाही त्यांनी दिला.
...
डॉ. अद्वय म्हणाले...
- सर्वप्रथम चांगले शिक्षण घ्या. मग आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावा व मगच समाजजीवनात या. हे पथ्य न पाळणारी मंडळी टक्केवारीच्या मागे लागतात, हे ध्यानी ठेवा. समाजजीवनात आल्यावर विचाराने प्रवाहित राहून लोकांची कामे करा.
- लोकप्रतिनिधींनाही किमान शिक्षणाची अट हवीच; पण ही बाब सरकार करीत नसले, तरी आडाण्याला मत देणार नाही, हा नियम मतदारांनीच करावा.
- कोणी, कसली व किती पिके घ्यावीत, हा क्रॉप पॅटर्न सरकारनेच शेतकऱ्यांना द्यावा. सरकारने हमीभाव निश्चित करावा आणि व्यापाऱ्यांनी त्यापेक्षा कमी भावाने खरेदी करू नये, असे बंधनही जरुरीचे आहे.
- आपण नेता म्हणून सक्षम असलो, आपले काम चांगले असले, तर कार्यकर्ते जरूर टिकून राहतात.
- आमदार शिवसेना सोडून गेले तरी पक्ष संपणार नाही. त्या विचारांचे लोक पुन्हा शिवसेनेला मोठे करतील.
- पूर्वी माझी निवडणूक लढवण्याची मानसिकता नव्हती. आता उद्धव ठाकरे यांनीच निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्याने मला तो आदेश पाळावाच लागेल.
- देशाची लोकसंख्या मोठी असल्याने सर्वच लोकांना सोयी देणे कठीण आहे; पण आजची मोठी तरुणांची फौज २०६० पर्यंत वृद्ध झाली, की नंतर आपोआपच आपली लोकसंख्या कमी होईल.
- शेतकऱ्यांप्रमाणे इतर आर्थिक दुर्बल घटकांनाही कर्जमाफी मिळायला हवी; पण आमच्याकडून राहिलेल्या या उणिवा तुम्ही तरुणांनी भरून काढाव्यात.