
लाखो लीटर पाणी वाया
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : तांत्रिक कारणामुळे ठाण्यात चार दिवस झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासन एकीकडे पाणी जपून वापरा, असे आवाहन करत असताना दुसरीकडे लाखो लीटर पाणी नाल्यात वाया जात असल्याचे उघडकीस आले आहे. कोपरी सॅटीस पुलाखाली पायलिंगचे काम करत असताना येथील जलवाहिनीला धक्का लागून फुटल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
सेवा रस्त्यावर सॅटीससाठी पायलिंगचे काम करताना काम करणाऱ्या यंत्रणेमुळे दोन दिवसांपूर्वी रात्री जलवाहिनी फुटली असल्याचे शहर काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उघडकीस आणले. कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधित यंत्रणेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाईपलाईन किती मोठी आहे, किती व्यासाची आहे याची माहितीही नसल्याचे यावेळी उघडकीस आले. त्यामुळे येथे काम करणाऱ्या यंत्रणेने दोन दिवसात पाणी थांबविण्यासाठी तब्बल चार गाड्या आरएमसी टाकून सुध्दा प्रवाह थांबलेला नव्हता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. या घटनेला जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पिंगळे यांनी केली आहे.