
बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला चार वर्षांची कैद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : जकात चुकवणाऱ्या गाड्यांना लावलेला ३० लाखांचा दंड कमी करण्यासाठी तीन लाखांची लाच घेताना बृहन्मुंबई महापालिका कांजूर मार्ग विभागाचे संकलक सुनील बळीराम बने याला ठाणे विशेष लाचलुचपत न्यायाधीश तथा ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित शेटे यांनी चार वर्षे साध्या कैदेची शिक्षा सुनावली; तर पर्यवेक्षक निरीक्षक संजय मारुती लोहोट यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
२९ मे २०१४ रोजी एका ट्रान्सपोर्टर कंपनीचे मालाने भरलेले सात टेम्पो वाशी जकात नाक्यावर बृहन्मुंबई महापालिकेच्या जकात विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवून जकात न भरल्याचे कारण दाखवत ते टेम्पो मालासहीत जप्त केले होते. जकात विभागाच्या कांजूरमार्ग येथील कार्यालयातील जकात विभागाचे अधिकारी आरोपी बने यांनी तक्रारदारांना ३० लाख दंडापैकी तुझी रक्कम कमी करून देऊ, पण त्या बदल्यात तुला ३० लाखांचे दहा टक्के म्हणजे मला तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटले होते. अशाप्रकारे त्यांनी तीन लाखांच्या लाचेची रक्कम घेतली होती. या प्रकरणी दोघांविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केलेले पुरावे व चार साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपींना चार वर्षे साधी कैद आणि १० हजार दंड अशी शिक्षा ठोठावली.