
मिनिट्रेनच्या एसी सलून डब्यांकडे पाठ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पर्यटकांची आवडत्या माथेरानच्या राणीला अर्थात मिनी ट्रेनला अतिरिक्त ‘विशेष एसी सलून डबा’ जोडण्यात आला आहे; परंतु २० दिवसांनंतरही आलिशान सलून डब्याला एकही बुकिंग मिळाले नसल्याचे समोर आले आहे. अवाच्या सव्वा तिकीट दर आणि आरक्षणाची किचकट प्रक्रिया यामुळे सलून डब्यांचे आरक्षण होत नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला दिली.
माथेरान हे मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सोयीसाठी २ फेब्रुवारी २०२३ पासून मिनी ट्रेनला अतिरिक्त विशेष एसी सलून डबा जोडला होता. हा एसी सलून कोच आठ आसनी असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी, त्याचप्रमाणे रात्रीच्या मुक्कामासाठी त्याचे बुकिंग पर्यटकांसाठी उपलब्ध आहे; मात्र दोन आठवडे उलटले तरी या कोचला एकही बुकिंग आलेले नाही. वाढीव तिकीट दर आणि ऑनलाईन बुकिंगची सोय नसल्याने प्रतिसाद मिळाला नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहेत तिकीट दर?
सलून कोचची एकाच दिवशी पूर्ण फेरी होईल. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत त्याचे तिकीट दर ३२ हजार ८८ रुपये आहे; तर रात्रीच्या मुक्कामासाठी १ हजार ५०० प्रतितासाने पैसे आकारले जातील. वीकेण्डला रात्रभर मुक्कामासह पूर्ण फेरीसाठी ४४ हजार ६०८ रुपये विविध करांसह आणि डिटेंशन शुल्कासह १ हजार ८०० प्रतितास दर आकारला जाईल. या सलून डब्याचे आरक्षण करण्याची प्रक्रियाही गुंतागुतीची असल्याची ओरड होत आहे.